भोपळा मिळवणाऱ्या मनसेच्या नशिबी दिव्यातील अंधार
By admin | Published: February 24, 2017 07:40 AM2017-02-24T07:40:27+5:302017-02-24T07:40:54+5:30
मागील महापालिका निवडणुकीत ठाणेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सात नगरसेवक निवडून
प्रज्ञा म्हात्रे / ठाणे
मागील महापालिका निवडणुकीत ठाणेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सात नगरसेवक निवडून दिले होते. मात्र, या वेळी ठाणेकरांनी मनसेला पूर्णपणे नाकारले. परिणामी, मनसेला भोपळा फोडता आला नाही.
सर्वाधिक मराठी माणसांची संख्या असलेल्या ठाणे शहरात व जिल्ह्यात भविष्यात शिवसेनेला टक्कर देऊन मराठी राजकारण करायचे असेल, तर राज यांना ठाण्यातील आपले संघटन मजबूत करावे लागेल. अन्यथा, मुंबईत अस्तित्वाकरिता धडपडणाऱ्या शिवसेनेला निदान ठाण्याचा टेकू लाभला असताना राज यांना आपल्या राजकारणाकरिता जमीन उरणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
दिवा महोत्सवानिमित्त राज दिव्यात आले होते, त्या वेळी त्यांनी तेथील दुरवस्था पाहून ‘दिव्याखाली अंधार’ हे एकच वाक्य उच्चारले होते. त्यानंतर, त्यांनी निवडणूक प्रचाराची सभाही दिव्यात घेतली. निवडणुकीच्या तोंडावर मनसेने दिव्यातील डम्पिंगच्या प्रश्नाला हात घातला. मनसे उपाध्यक्ष अभिजित पानसे हे डम्पिंग ग्राउंडवर उपोषणाला बसले होते. मनसेने ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील निवडणूक लढवण्याकडे साफ दुर्लक्ष करून दिव्यावर लक्ष्य केंद्रित केले होते. दिव्यात नव्याने राहण्यास आलेला कोकणी माणूस आपल्या पाठीशी उभा राहील व आपल्याला किमान १० जागा मिळवून किंगमेकर होता येईल, असे स्वप्न राज बघत होते. परंतु, त्यांचे हे स्वप्न भंगले आणि त्यांच्या पदरी भोपळा पडला. मनसेचा मतदारांनी मोठा भ्रमनिरास केला. राज यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची सभा दिव्यात घेऊन दिवा दत्तक घेण्याची, दिव्याला पाणी देण्याची घोषणा केली होती. तसेच, एका वर्षात डम्पिंग हटवण्याचे आश्वासनही दिले. मात्र, या ठिकाणांच्या मतदारांनी मनसेपाठोपाठ भाजपालाही ठेंगा दाखवला. ज्या भाजपावर ‘थापा मारणारा पक्ष’ अशी टीका राज यांनी वारंवार केली, त्याचा फायदा दिव्यात तरी शिवसेनेला झाला आणि शिवसेनेचा जनाधार तोडण्यात मनसे आणि भाजपाला अपयश आले. शिवसेनेवर केलेले आरोप मात्र मतदारांनी मनावर न घेता उलट सेनेला त्यांनी भरभरून मतदान केले.
ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेच्या सर्वच्या सर्व १०७ उमेदवारांना हार मानावी लागली. २००७ साली मनसेने ठाणे महापालिकेची पहिली निवडणूक लढवली आणि तीन नगरसेवक निवडून आले.