पालिकेमुळेच टीडीआर घोटाळा , शेतकऱ्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:18 AM2018-09-26T04:18:02+5:302018-09-26T04:18:11+5:30
माजी सैनिक व शेतकरी कुटुंबांची सातबारा आदींवर नोंद असतानाही त्यांना डावलून मीरा- भार्इंदर महापालिकेने परस्पर बिल्डरला टीडीआर दिला.
मीरा रोड - माजी सैनिक व शेतकरी कुटुंबांची सातबारा आदींवर नोंद असतानाही त्यांना डावलून मीरा- भार्इंदर महापालिकेने परस्पर बिल्डरला टीडीआर दिला. वर्षभर शेतकरी कुटुंब पालिकेपासून थेट मंत्रालयापर्यंत चपला झिजवनूही महापालिका मात्र शेतकºयांचा हक्क न देता या टीडीआर घोटाळ्याला पाठीशी घालण्याचे काम करत आहे असा आरोप शेतकºयांनी केला. तर महसूल विभागानेही न्याय देण्याऐवजी न्यायालयात जाण्याचा सल्ला देत हात झटकले आहेत.
भार्इंदर पूर्वेच्या नवघर गावातील जमीन वामन पाटील यांच्या नावे होती. त्यांच्या निधनानंतर ही जमीन त्यांचे वारस जनार्दन पाटील व अन्य ११ जणांच्या नावावर १९८७ मध्ये महसूली फेरफारने झाली. एकूण १२ वारस असताना मीरा भार्इंदर महापालिकेने मात्र सातबारा नोंदीतील केवळ पाटील यांनाच गृहित धरून राकेश अग्रवाल यांच्या डिंपल कंस्ट्रक्शनला परस्पर विकास आराखड्यातील रस्त्यासाठी टीडीआर दिला. आपल्या जागेच्या सातबारा नोंदी मीरा भार्इंदर महापालिकेच्या नावे आल्याचे कळताच माजी सैनिक चितरंजन पाटील व अन्य शेतकºयांनी गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये महापालिकेबरोबरच संबंधितांकडे तक्रार केली.
शेतकरयांच्या तक्रारीवर तत्कालिन नगररचनाकार दिलीप घेवारे यांनी त्वरीत डिंपल कंस्ट्रक्शनला पत्र पाठवून १५ दिवसात खुलासा द्या अन्यथा कार्यवाही करू असे कळवले. परंतु त्यानंतर मात्र आजतागायत विद्यमान नगररचनाकार श्रीकांत देशमुख व संबंधित अधिकाºयांनी कार्यवाहीच केलेली नाही. शेतकरी कुटुंबीयांनी पालिकेकडे सातत्याने तक्रारी केल्या. आयुक्तांपासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या. परंतु कार्यवाही झालेली नाही. उपविभागीय अधिकाºयांनाही तक्रारीवर दिवाणी न्यायालयात जाऊन दाद मागावी असा सल्ला दिला.
अधिकारी बैठकीत व्यस्त
सात-बारा नोंदी तसेच फेरफार आदीवर जनार्दन पाटील व अन्य अशी स्पष्ट नोंद असतानाही डोळेझाक केली गेली. महापालिका अधिकारी, डिंपल कन्स्ट्रक्शन यांनी संगनमताने भूमिपुत्र शेतकºयांचा हक्क डावलून हा टीडीआर घोटाळा केला, असा आरोप सुहास पाटील यांनी केला.
तर या प्रकरणी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. सहायक संचालक श्रीकांत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता आपण बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.