ठाण्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे चिमुकलीचा नाहक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:35 PM2018-04-03T20:35:12+5:302018-04-03T20:35:12+5:30
वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीमुळे लोकमान्यनगरातील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी घडली. मुलीचा नाहक बळी गेल्यामुळे वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाणे : महावितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील सिद्धी रामचंद्र गुप्ता (९) या चिमुकलीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी वीज कर्मचारी दत्ता पाटील यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून महावितरण कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी मुलीच्या पालकांसह येथील रहिवाशांनी केली आहे.
महावितरण कंपनीचे कर्मचारी दत्ता पाटील यांनी १ एप्रिल २०१८ रोजी पाडा क्रमांक चार येथील टेमकर चाळीत वीजवाहिनी टाकण्याचे काम केले. ते करताना कोणतीही तपासणी न करता ती तशीच चाळीच्या पत्र्यावर टाकून ते निघून गेले. ती वाहिनी उघडी किंवा कुठेतरी कट झालेली होती. त्यामुळे चाळीच्या लोखंडी अँगल, जिना आणि कमलेश उतेकर यांच्या घरासमोरील सुरक्षा ग्रीलमध्ये विद्युत प्रवाह उतरला. २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास चाळीच्या लोखंडी जिन्याजवळ सिद्धी आल्यानंतर तिला या वीजेच्या जबर धक्का बसला. तिला शेजाºयांनी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीचे नातेवाईक कमलेश उतेकर यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीचे कर्मचारी दत्ता पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. केवळ गुन्हा दाखल न होता नुकसानभरपाईदेखील मिळावी, अशी मागणीही या कुटूंबियांनी तसेच परिसरातील रहिवाशांनी केली आहे.