नवीन पुलामुळे पावसाळ्यात भिवंडीत पुराची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:43 AM2019-05-03T00:43:48+5:302019-05-03T00:44:09+5:30

कामवारी नदीपात्रात भराव : गणेश विसर्जनासाठीही होणार अडथळा, भक्तांमध्ये नाराजीचा सूर

Due to the new bridge, fear of floods in the rainy season | नवीन पुलामुळे पावसाळ्यात भिवंडीत पुराची भीती

नवीन पुलामुळे पावसाळ्यात भिवंडीत पुराची भीती

Next

भिवंडी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतभिवंडी-वाडा मार्गावर नव्याने पुलाचे बांधकाम सुरू असून यासाठी कामवारी नदीच्या पात्रात टाकलेल्या मातीमुळे पावसाच्या पाण्यामुळे परिसरात पूर येण्याची शक्यता वाढली असून नागरिकांनी संबंधितांकडे तक्रारी केल्या आहेत. तर, या नव्या पुलामुळे गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना टिळक घाटावर मोठा अडथळा निर्माण होणार असून याबाबत गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अहमदाबादहून मुंबईकडे अवजड वाहनांना जाण्यासाठी ग्रामीण भागातून विविध ठिकाणी नव्याने रस्ते व महामार्ग तयार केले आहेत. तरीही, वाडा-भिवंडी मार्गावरून अनेक अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने शहरावर ताण येत आहे. तसेच सध्या या मार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून होणाºया वाहतुकीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून नव्याने दोनपदरी पूल बांधण्याचे काम सुरू करण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहे. मागील महिन्यात पुलाचे काम करण्यासाठी नदीपात्रात माती टाकली आहे. एक महिन्यावर पावसाळा आला असून वेळीच काम पूर्ण झाले नाही, तर नदीपात्रातील पाणी वाढून परिसरात पूर येण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नव्याने बांधण्यात येणारा पूल हा गणेश विसर्जनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व लहानमोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनास अडथळा निर्माण होणार आहे. अनेक वर्षांपासून नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर पाच हजारांपेक्षा अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यापैकी शहराच्या बाजूला नदीपात्राकडे गणेश विसर्जनाला जाण्यासाठी तनवीर फरीद यांनी जागा दिली आहे. तेथे महापालिकेच्या सहकार्याने गणेश विसर्जनासाठी टिळकघाट तयार करण्यात आला आहे. या पुलाचे बांधकाम करताना संबंधित अधिकाऱ्यांनी गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत कोणताही विचार न केल्याने खंत व्यक्त केली जात आहे.

नव्याने बांधण्यात येणारा पूल सध्याच्या पुलापेक्षा थोडा उंच असून ८४ मीटर लांब व साडेसात मीटर रुंद असा दोनपदरी असणार आहे. त्यास साडेसहा कोटी रुपयांचा खर्च येणार असून नदीपात्रासह सहा खांबांवर हा पूल उभा राहणार आहे. तसेच जुन्या पुलाचे व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल आॅडिट केले असून नव्याने पूल बांधून झाल्यानंतर जुन्या पुलाचे मजबुतीकरण होणार आहे. त्याची लांबी ७० मीटर असून नव्या पुलाची लांबी १४ मीटरने दोन्ही बाजूंनी वाढणार आहे. हा पूल बांधण्यास १२ महिन्यांची मुदत दिलेली आहे. मात्र, याची माहिती लावलेली नाही.

अनेक वर्षांपासून शहरातील लहानमोठ्या गणपतीच्या मूर्ती कामवारी नदीत विसर्जनासाठी नेल्या जातात. शेलारच्या बाजूकडे मोठ्या उंचीच्या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यासाठी पालिका दरवर्षी सोय करते. तर, टिळक घाटावर लहान व मध्यम आकाराच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात. हा पूल या जागी न बांधता पलीकडील बाजूस बांधल्यास या मार्गावरून जाणाºया गणेशमूर्तींना अडथळा येणार नाही. तसेच वाहनांना जाण्याची सोयही होईल. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत. - मदन भोई, अध्यक्ष भिवंडी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ

पावसाळ्यापूर्वी उभारणार खांब
याबाबत, उपविभागीय अभियंता सचिन धात्रक यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी तो होऊ शकला नाही. विभागीय अभियंता ए.एस. पवार यांनी सांगितले की, पुलाचे काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे. नदीमध्ये खांब टाकण्यासाठी पुलाचे ड्रॉइंग बनवण्यास उशीर झाला आहे.

Web Title: Due to the new bridge, fear of floods in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.