तक्रारीची दखल घेत नसल्याने नगरसेविकेला रडू कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:16 AM2019-05-30T01:16:47+5:302019-05-30T01:16:51+5:30
मीरा गावातील गावकीची जागा असल्याचा दावा करत त्यातील जुन्या बांधकामाची बेकायदा दुरूस्ती सुरू केल्याच्या विरोधात काही ग्रामस्थांनसह प्रभाग समिती सभापती वीणा भोईर यंनी महापालिकेकडे तक्रार केली होती.
मीरा रोड : मीरा गावातील गावकीची जागा असल्याचा दावा करत त्यातील जुन्या बांधकामाची बेकायदा दुरूस्ती सुरू केल्याच्या विरोधात काही ग्रामस्थांनसह प्रभाग समिती सभापती वीणा भोईर यंनी महापालिकेकडे तक्रार केली होती. पण बेकायदा बांधकाम रोखण्याऐवजी कारवाईस पालिका आयुक्तांसह प्रभाग अधिकारी टाळटाळ करत असल्याने जर तक्रारींवर कारवाईच होत नसेल तर नगरसेवक आणि सभापतीपदाचा उपयोग काय असे सांगत आयुक्त दालनातच भोईर यांना रडू कोसळले. अखेर आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यास तातडीने फोन करुन काम बंद करण्याचे आदेश दिल्या नंतर भोईर शांत झाल्या.
मीरा गावातील गावदेवी मंदिराजवळ पडीक असणारी चमचा कंपनी गेली अनेक वर्ष बंद आहे. परंतु या कंपनीचे छप्पर काढून पूर्णपणे दुरूस्तीचे काम केल्याने भोईर यांनी प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांना फोन करून तक्रार केली. परंतु बोरसेंनी बेकायदा दुरूस्तीचे काम थांबवले नाही शिवाय कोणतेही लेखी उत्तरही दिले नाही. त्यामुळे २१ मे रोजी भोईर यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली.
बोरसे यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी बेकायदा दुरूस्तीचे काम रोखले नाहीच उलट ते काम बेकायदा नसल्याचे सांगत कारवाईस नकार दिल्याचे भोईर यांनी तक्रारीत नमूद केले. परंतु त्यानंतरही आयुक्त व बोरसे यांनी कारवाई केली नाही. या विरोधात गावातील काही ग्रामस्थांनी सोमवारी बैठक घेऊन सामूहिक सह्या करत आयुक्तांच्या नावे तक्रार केली. ग्रामस्थांनी निवेदनात ही जमीन गावकीची असून बेकायदा बांधकाम तातडीने बंद करत कारवाईची मागणी केली.
भोईर यांनी ग्रामस्थांची तसेच स्वत:ची तक्रार घेऊन मंगळवारी आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनीही कारवाईस असमर्थता व्यक्त केल्याने प्रभाग अधिकाºयापासून आयुक्तांना लेखी तक्रारी देऊनही जर कारवाई होत नसेल तर आम्ही सभापती आणि नगरसेवकपदी राहून उपयोग काय ? असा सवाल भोईर यांनी केला. तक्रार करूनही पालिका अधिकारी उडवाउडवी करत असल्याने त्यांना रडू कोसळले. त्यावेळी समिती सदस्य सजी आयपीसुध्दा उपस्थित होते. आयुक्तांनी त्यांची समजूत काढत बोरसे यांना मीरा गावातील काम बंद करण्याचे आदेश दिले.
>सजी यांनी हसण्यावर नेले
या बाबत सजी यांना विचारणा केली असता ते केवळ हसले व बोलायचे टाळले. तर भोईर यांनी मात्र घडलेल्या घटनेस दुजोरा देत अधिक बोलणे टाळले.