दारूसाठी पैसे न दिल्याने ठाण्यात पत्नीचा खून करणाऱ्या पतीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 08:33 PM2018-05-18T20:33:56+5:302018-05-18T20:33:56+5:30
केवळ दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून व्यसनी व्यसनी पतीने पत्नीचा खून केल्याची घटना वागळे इस्टेटमधील साठेनगर येथे घडली. याप्रकरणी पती संजय सोनी याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून संजना ऊर्फ संजू संजय सोनी (२७, रा. साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या पत्नीचा गळा आवळून खून करण-या संजय सोनी (३६) या पतीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्याला २० मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
व्यसनी संजयने १७ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पत्नी संजनाकडे दारूसाठी पैशांची मागणी केली होती. त्यानंतर, त्याने त्याच्या आईकडेही पैशांची मागणी केली. या दोघींनीही पैसे न दिल्याने संजनाबरोबर त्याने वाद घातला. या रागातूनच त्याने संजनाच्या तोंडावर उशी दाबून नंतर पंख्याच्या वायरने गळा दाबून खून केला. असहाय संजनाने मदतीसाठी धावा केला. मात्र, तोंडावर आधीच उशी दाबल्याने तिला फारसा प्रतिकार करता आला नाही. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा प्रकार शेजाºयांनाही समजला. त्यावेळी पोलिसांच्या मदतीने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या पथकाने त्याचा शोध घेतला, त्यावेळी तो घटनास्थळी निर्विकारपणे हसत होता. आपणच हा खून केला. त्यावर कोणताही पश्चात्ताप नसल्याचेही तो पोलिसांना म्हणाला. घटनास्थळावरून तिला फाशी देण्यासाठी वापरलेली वायर, उशी आणि पंख्याची वायर कापण्यासाठी त्याने वापरलेला चाकूही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
* प्रेमविवाह असूनही केला खून
संजय आणि संजना या दाम्पत्याचा १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नाला विरोध असल्याने तिच्या माहेरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते. तर, त्याचे आईवडीलही त्यांच्यापासून विभक्त वास्तव्याला होते. त्यांच्या घराजवळच साठेनगर भागात ते वास्तव्याला होते. पती संजय काहीच कामधंदा करत नसल्याने ती धुणीभांडी करून कुटुंबाची गुजराण करत होती. मात्र, तरीही तो तिच्याकडे नेहमीच दारूसाठी पैशांचा तगादा लावत होता. त्यातूनच तो तिला मारहाणही करायचा. गुरुवारी पहाटेही त्यांच्यात असाच वाद झाला. याच वादातून त्याने तिचा खून केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.