प्रदूषणामुळे डोंबिवलीतील नाल्याचा प्रवाह झाला हिरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:21+5:302021-07-20T04:27:21+5:30
कल्याण : डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न ऐन पावसात पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील एका कंपनीने मुसळधार पावसाचा फायदा घेत चक्क ...
कल्याण : डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न ऐन पावसात पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील एका कंपनीने मुसळधार पावसाचा फायदा घेत चक्क नाल्यात केमिकल सोडल्याने नाल्याचा प्रवाह हिरवा झाला. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीविरोधात कठोर कारवाई, अशी सूचना केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. तर, एमआयडीसीने या कंपनीचा पाणीपुरवठा खंडित केला आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांकडून जल आणि वायू प्रदूषण केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जातात. पूर्वेतील गांधीनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचा प्रवाह सोमवारी हिरवा झाला. हा प्रवाह नैसर्गिक नसून प्रदूषित पाण्याचा असल्याचे नागरिकांच्या लगेच लक्षात आले. या हिरव्या नाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. या प्रकरणाची सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेत एमआयडीसीशी संपर्क साधला. त्यानंतर एमआयडीसीने याप्रकरणी रायबो फाम कंपनीचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. या कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी सूचना सूर्यवंशी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली आहे. मात्र, त्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही हालचाल केलेली नाही.
गांधीनगरातील रहिवासी शशीकांत कोकाटे म्हणाले, ‘कंपन्या रासायनिक पाणी साठवून ठेवतात. मग ते भर पावसात नाल्यात सोडण्याचा प्रताप करतात. हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे.’ दरम्यान, या घटनेची दखल घेत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना ट्वीट करून जीवघेण्या प्रदूषणापासून डोंबिवलीतील नागरिकांची सुटका कधी होणार, असा सवाल केला आहे.
कोरोनामुळे कार्यवाही थंडावली
२०१४ मध्ये डोंबिवली प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला होता. तर, २०१९ मध्ये प्रदूषणामुळे डोंबिवलीत रस्ता गुलाबी झाला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली होती. त्यानंतर प्रदूषण करणाऱ्या कंपन्या सुधारल्या नाही तर त्यांना टाळे ठोकण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, अग्निशमन दल आदींनी संयुक्तरित्या ३०२ कंपन्यांचे सर्वेक्षण केले होते. मात्र, कोरोनामुळे पुढे काहीच कार्यवाही झाली नाही.
----------------------