खड्ड्यांमुळे ग्रामीण भागात प्रवासी वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:57 PM2018-07-27T23:57:42+5:302018-07-27T23:58:10+5:30

तालुक्यातील मुख्य रस्त्यावर ४७८जीवघेणे खड्डे; दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीचा फटका

Due to potholes, the result of passenger traffic in rural areas | खड्ड्यांमुळे ग्रामीण भागात प्रवासी वाहतुकीवर परिणाम

खड्ड्यांमुळे ग्रामीण भागात प्रवासी वाहतुकीवर परिणाम

googlenewsNext

-अरुण जंगम

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. म्हसळा ते दिघी हे अंतर ३० किमी आहे. म्हसळा शहरापासून बनोटी, खरसई, मेदडी, वारळ, काळसुरी, तुरु बाडी, रोहिणी, हरवीत, कुडगाव ही मुख्य लोकसंख्येची गावे आहेत. म्हसळा शहराच्या दिघी मार्गावरील रस्त्याची पूर्णत: वाताहत झालेली आहे. दुचाकीस्वार तसेच रिक्षा चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. ग्रामीण भागाला जोडणारे रस्तेही खड्डेमय झाल्याने प्रवासी वाहनांच्या संख्येत घट झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
मेदडी गावाच्या एसटी बस थांब्यालगत रस्ता पूर्णपणे खचला आहे. मेदडी शिवाजी नगर ते खरसई रस्ता अवघड वळणाचा आहे, तीन महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी एसटी बसच्या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले होते. रस्त्याची रु ंदी १८ फूट आहे. हरवीत, कुडगाव ते दिघी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. हरवीतजवळ काही ठिकाणी रस्ता खचला आहे. दिघी पेट्रोल पंपाजवळ मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीचा परिणाम येथील रस्त्यांवर दिसून येत आहे. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई रस्ता तसेच पांगलोली रस्ता खड्ड्यांमुळे स्थानिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
म्हसळा तालुक्यात पर्यटनास चालना देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच परिसर सुशोभीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांची परिसरात गर्दी होत आहे. श्रीवर्धन तालुक्यात प्रवेश करण्यासाठी म्हसळा शहर प्रवेशद्वार मानले जाते, तसेच दिवेआगार व दिघीकडे मार्गक्र मण करण्यासाठी म्हसळा शहर महत्त्वाचे आहे. म्हसळा तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या घोणसे घाटात अपघाताची मालिकाच सुरू असून गेल्या दहा वर्षात अनेकांना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याने योग्य उपाययोजना न केल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्रात सूचना फलकाव्यतिरिक्त काहीच काम केल्याचे निदर्शनास येत नाही. संपूर्ण घोणसे घाटात दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी अवघड वळणांवर रस्ता खचल्याने खडी बाहेर आल्याने अपघातांची तीव्रता वाढली आहे.
श्रीवर्धन हे नावारूपाला येणारे पर्यटन क्षेत्र आहे. श्रीवर्धन नगरपरिषद प्रत्येक महिन्याला सत्तर हजार रु पये पर्यटक निधी जमा करते. परंतु म्हसळा तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे पर्यटकांचा ओढा कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्याला मिळणारा पर्यटन निधी घटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील असंख्य पर्यटक श्रीवर्धन व श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे हजेरी लावतात. मुंबई, पुणे येथील पर्यटक आठवडा सुटीसाठी श्रीवर्धन व दिवेआगरला पसंती देतात. त्या कारणे माणगाव शहरातून लोणेरे व साई मार्गे पर्यटक श्रीवर्धन व दिवेआगरकडे मार्गक्र मण करतात.
माणगाव साईमार्गे श्रीवर्धन ४८ किलोमीटर अंतर आहे, तर मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरेपासून श्रीवर्धन ५0 किलोमीटर अंतरावर आहे.पर्यायाने पर्यटक दोन्ही मार्गांचा अवलंब करतात.साई मार्गेम्हसळा श्रीवर्धन हमरस्त्यावर नाइटने,मोर्बाघाट, घोणसे घाट ही अपघातप्रवण क्षेत्रे असताना या घाटाची कोणतीही दुरु स्ती केलेली दिसत नाही.

म्हसळा-दिघी या राज्यमार्गावर आम्ही रोज बोर्लीपर्यंत, तसेच मजगावपर्यंत मिनीडोर चालवितो. या रस्त्यावर दिघी पोर्टची अवजड वाहतूक कायमस्वरूपी सुरू असल्याने रोडची अवस्था फार बिकट झाली आहे. त्यामुळे वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. पोलीस प्रशासनाने या अवजड वाहतुकीवर कारवाई करावी.
-अभय कलमकर, सचिव, मिनीडोर प्रवासी वाहतूक संघटना

दिघी पोर्टच्या ओव्हरलोड गाड्यांवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे, मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने दिघी पोर्टची वाहतूक भर दिवसा देखील भरधाव वेगाने सुरू असते. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याला सर्वस्वी दिघी पोर्ट जबाबदार आहे.
- अनुजा हिरेमठ, अध्यक्ष, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, म्हसळा

श्रीवर्धन आगाराच्या सर्व चालकांना अपघातप्रवण क्षेत्रात त्याचप्रमाणे खड्डेमय रस्त्यांवर सावधानतेने वाहन चालविण्याचे सांगितले आहे. मात्र खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- रेश्मा गाडेकर, आगारप्रमुख श्रीवर्धन आगार

जवळपास सर्वच मार्गावर खड्डे पडल्याने चालकांना वाहन चालविणे त्रासदायक होत असल्याने लवकरात लवकर या रस्त्यांचे काम करावे.
- सचिन गुरव,
बसचालक, श्रीवर्धन आगार

Web Title: Due to potholes, the result of passenger traffic in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.