ठाणे वाहतूक पोलिसाच्या कर्तव्य तत्परतेमुळे महिलेचा लॅपटॉप मिळाला परत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 03:52 PM2021-12-27T15:52:46+5:302021-12-27T15:54:54+5:30
रिक्षाने ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या श्रद्धा पारखी या महिलेचा लॅपटॉप प्रवासात गहाळ झाला होता. तो ठाणे शहर वाहतूक शाखेचे जमादार प्रविण जाधव यांनी तत्परता आणि बुद्धीचातूर्याने अवघ्या दीड तासांमध्ये नुकताच मिळवून दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रिक्षाने ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या श्रद्धा पारखी या महिलेचा लॅपटॉप प्रवासात गहाळ झाला होता. तो ठाणे शहर वाहतूक शाखेचे जमादार प्रविण जाधव यांनी तत्परता आणि बुद्धीचातूर्याने अवघ्या दीड तासांमध्ये नुकताच मिळवून दिला. जाधव यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करुन कौतुक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी दिली.
दादर येथील रहिवासी असलेल्या पारखी या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात कार्यरत आहेत. त्या १९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी रिक्षाने ठाणे रेल्वे स्थानकाकडे जात होत्या. याच दरम्यान प्रवासात त्यांचा लॅपटॉप गहाळ झाला. त्यांनी बराच शोध घेऊनही तो मिळाला नाही. साडेतीन वर्षांची मेहनत आणि लॅपटॉप मध्ये असलेल्या लहान मुलांच्या उपचाराबाबतचे अनेक प्रोजेक्ट्सचे काय होणार ? या चितेंतच दुसºया दिवशी २० डिसेंबर रोजी त्यांनी नौपाडा येथील समर्थ भांडार वाहतूक नियंत्रण शाखेच्या चौकीजवळ कर्तव्यावर असलेल्या जमादार जाधव यांच्याशी संपर्क साधला. लहान मुलांच्या उपचाराबाबतच्या प्रोजेक्टसची माहिती त्यांना जर्मनीमध्ये सादर करायची होती. त्यामुळे हा लॅपटॉप आणि त्यातील माहिती मिळणे आवश्यक होते. हा सर्व प्रकार पारखी यांनी सांगितला. रिक्षाचा पुरेसा क्रमांकही नसल्यामुळे लॅपटॉप शोधणे हे तसे आव्हानाचेच काम होते. परंतू त्या परिस्थितीतही त्यांनी पारखी यांना धीर देऊन लॅपटॉप मिळवून देण्याबाबत दिलासा दिला. अनुभव आणि बुद्धिकौशल्य वापरून त्यांनी केवळ दीड तासात त्या रिक्षा चालकाचा शोध घेतला. नंतर त्याच्याकडे सर्व चौकशी करुन त्यांचा लॅपटॉपही त्याच्याकडून परत मिळवून दिला. या रिक्षामध्ये सीटच्या मागच्या बाजूला लॅपटॉप तशाच अवस्थेत होता. तो रिक्षा चालकाच्याही लक्षात आला नव्हता. लॅपटॉप परत मिळाल्याच्या आणि जाधव यांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेच्या या सुखद अनुभवाबद्दल श्रद्धा पारखी यांनी सर्व वाहतूक पोलिसांचे आभार मानले. ही माहिती मिळताच ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी जमादार जाधव यांचा शनिवारी सत्कार करीत त्यांचे कौतुक केले. अशी कर्तव्यतत्परता दाखविलेल्या जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.