पावसामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले
By Admin | Published: November 24, 2015 01:36 AM2015-11-24T01:36:50+5:302015-11-24T01:36:50+5:30
रविवारी रात्री तलासरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसाची ३८ मिमी नोंद झाली.
तलासरी : रविवारी रात्री तलासरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसाची ३८ मिमी नोंद झाली. अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक जेमतेम आले, त्यात भाताच्या उत्पन्नात घट आणि अशातच भातावर पडलेला रोग, यातूनही वाचलेल्या भातपिकाची कापणी करून ते शेतकऱ्याने शेतात टाकले. भाताच्या गंजीही शेतावर लावल्या होत्या. परंतु, रविवारच्या पावसामुळे कापून ठेवलेले भातपीक भिजून गेले.
तलासरीत रविवारपासून ढगाळ वातावरण आहे. अचानक मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. भातपीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला, परंतु पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. (वार्ताहर)
वाडा तालुक्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीचा खर्च करून वर आलेले धान्य भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे केली आहे. तालुक्यात अचानक अवकाळी पाऊस
झाल्याने भातपीक, भाजीपाला, कलिंगड, वाल, हरभरा, तूर, मूग, उडीद, फुलझाडे, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांनी सहकारी सोसायट्या व बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड कशी करायची हा प्रश्न आहे.पावसाने भात पूर्ण भिजल्याने व्यापारी हे भातखरेदी करू शकणार नाहीत. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत शेतकरी सापडला असल्याचे निवेदन नमूद केले आहे. दरम्यान, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पठारे यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत, तालुका कृषी अधिकारी ए.बी. वारे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.