पावसाने पाठ फिरवल्याने धरण क्षेत्र अद्याप कोरडेच, भातसा-बारवीसह सर्वत्र पाणीसाठा आटला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 01:29 AM2019-06-25T01:29:57+5:302019-06-25T01:30:17+5:30
मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही.
- सुरेश लोखंडे
ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्यातील काही प्रमुख शहरांमध्ये सोमवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने उन्हाच्या काहिलीपासून तात्पुरता दिलासा लाभला असला तरी मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही. मुंबई महानगरास पाणीपुरवठा करणाºया व ब्रिटिशकालीन सर्वाधिक मोठ्या भातसा धरणात मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी म्हणजे २३.१९ टक्के पाणीसाठा आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांना पाणी पुरवणाºया बारवी धरणातही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अवघा १४.९० टक्के इतका साठा शिल्लक आहे. अन्यही धरणांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत कमी साठा शिल्लक असल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात येत्या आठ ते दहा दिवसांत धो धो पाऊस झाल्याखेरीज मुंबई व ठाणेकरांना दिलासा लाभणार नाही. अन्यथा मोठ्या कपातीला तोंड देण्याची पाळी येथील कोट्यवधी लोकांवर येणार आहे.
या धरणांमधील पाणीसाठ्याची तूट भरून काढण्यासाठी नोव्हेंबरपासूनच पाणीकपात लागू केली आहे. येत्या १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठ्याच्या जबाबदारीस अनुसरून जून संपत आला असतानाही तीव्र पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला विलंब झाला आहे. सोमवारी काही ठिकाणी सकाळी पाऊस पडला. पण, आजपर्यंत केवळ २४.३ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर त्याचा अभावच आहे. यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी पाऊस सरासरी २८३ मिमी म्हणजे ७७.८ टक्के पडला होता. मात्र, यंदा पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात किंचितही वाढ झालेली नाही.
जिल्ह्यातील भातसा धरणात मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा केवळ १४.९० टक्के म्हणजे ३४.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षी आजच्या दिवसापर्यंत ६३.५६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक होता. याप्रमाणेच आंध्रा धरणात ७२.२५० दशलक्ष घनमीटर म्हणजे २१ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २५.४५ टक्के पाणीसाठा या धरणात होता. या धरणातील पाणी उल्हास नदीद्वारे जिल्ह्यातील महापालिकांना पुरवले जाते. पण, १५ जुलैपर्यंत नक्कीच धरणातील पाणीसाठा वाढेल. याशिवाय, कर्जतच्या डोंगर परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी बारवी धरणाखालून लिफ्ट करून शहरांना पुरवण्यात येणार असल्याचे लघुपाटबंधारे विभागाने सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांच्या क्षेत्रात तर पाऊस झालेला नाही. त्यामुळे आठवडाभरात धरणांच्या क्षेत्रात धो धो पाऊस झाला नाही तर परिस्थिती चिंताजनक होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पावसाच्या हलक्या सरींमुळे दिलासा
जून महिना सरत आला तरी पाऊस सुरु न झाल्याने उकाड्याने हैराण असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना सोमवारी सकाळी झालेल्या पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा लाभला. अनेकजण छत्र्या घेऊन घराबाहेर पडले. मात्र दुपारनंतर पुन्हा ऊन पडल्याने उकाडा जाणवू लागला. त्यामुळे छत्र्यांचे लोढणे बाळगणे अनेकांच्या वाट्याला आले. मात्र, अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने चिंता वाढली आहे.