‘त्या’ दुरूस्तीच्या कामामुळे कंत्राटी कर्मचा-यांची आबाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 05:56 PM2018-03-14T17:56:28+5:302018-03-14T17:56:28+5:30
कल्याण: देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. नाटयगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटायला आला तरी कामाला सुरूवात न झाल्याने एकिकडे आश्चर्य व्यक्त होत असताना दुसरीकडे याठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या हाताला गेले वर्षभर काम नसल्याने त्यांचीही पुरती आबाळ झाली आहे.
कल्याण: देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. नाटयगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटायला आला तरी कामाला सुरूवात न झाल्याने एकिकडे आश्चर्य व्यक्त होत असताना दुसरीकडे याठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या हाताला गेले वर्षभर काम नसल्याने त्यांचीही पुरती आबाळ झाली आहे.
आचार्य अत्रे रंगमंदिर नाटयगृहाची स्थिती आलबेल नसल्याने तसेच डागडुजी करण्याच्या अनुषंगाने या रंगमंदिराचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतू आजवर कामाला सुरूवात झालेली नाही. दुरूस्तीच्या कामांची निविदा प्रक्रिया पार पडून देखील आतापर्यंत कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. त्यात कार्यादेश मिळाल्याशिवाय कामाला प्रारंभ नाही अशी भुमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. मंजूर केलेल्या निविदेला स्थायी समितीची मान्यता घेणे देखील आवश्यक असून ही प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही. त्यामुळे दुरू स्तीचे काम सुरू होण्यास अधिक विलंब लागण्याची शक्यता आहे. दरम्यान नाटकाचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी पडद्यावरील कलाकारांइतकीच पडद्यामागील कुशल कर्मचा-यांचीही तितकीच महत्वाची भुमिका असते. परंतू अत्रे रंगमंदिर दुरूस्तीसाठी बंद ठेवले गेल्याने तेव्हापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून येथील सात कर्मचा-यांवर कामाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. हे लाईट, वातानुकुलीत यंत्र, जनरेटर व साऊंड अशी विविध जबाबदारी सांभाळणारे हे सात कर्मचारी अत्रे रंगमीदर ज्यावेळेस उभारण्यात आले तेव्हापासून याठिकाणी काम करीत आहेत. याठिकाणचा कामाचा पसारा पाहता आणखीन कर्मचा-यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. परंतू केडीएमसीने केवळ सातच कर्मचारी तेही कंत्राटी पध्दतीने नेमले आहेत. विशेष बाब म्हणजे गेली अनेकवर्षे काम करणा-या या कर्मचा-यांना कायमस्वरूपी महापालिका सेवेत सामावून घ्या असा ठराव देखील महासभेत मंजूर करण्यात आला आहे. पण त्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याप्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांनी तर या कर्मचा-यांना भेडसावणा-या गैरसोयींचा पाढा तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे कथन करून संबंधित कर्मचा-यांना महापालिका सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली होती. सेवेत कायम करण्यास प्रशासनाला मुहूर्त गावला नसताना आता तर गेले वर्षभर नाटयगृह बंद राहील्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचा-यांची वयही तिशीच्या वर उलटल्याने अन्य कोठे नोकरी मिळू शकत नाही. परिणामी वर्षभर आबाळ सुरू असल्याची व्यथा त्यांनी लोकमतकडे मांडली.