आरक्षण बदलामुळे दिव्यातील खेळाच्या मैदानाचा जाणार बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:41 AM2018-12-05T01:41:09+5:302018-12-05T01:41:22+5:30
दिवा रेल्वे स्थानकाजवळील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडाचा ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या २० मीटर रुंद रस्त्यासह प्राथमिक शाळेकरीता बळी जाणार आहे.
- नारायण जाधव
ठाणे : दिवा रेल्वे स्थानकाजवळील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडाचा ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या २० मीटर रुंद रस्त्यासह प्राथमिक शाळेकरीता बळी जाणार आहे. याबाबतच्या आरक्षण बदलास राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली असून दिवा येथील पार्किंगसह खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर नव्याने २० मीटर, १० मीटर रुंदीचे दोन नवीन रस्ते, प्राथमिक शाळा, निवासी भाग आणि रेल्वेच्या वापराकरीता आरक्षण बदलाकरीता नागरिकांकडून आता हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
दिवा परिसराचा झपाट्याने विकास होत असून येथील लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यानुसार रस्ते अपुरे पडू लागले असून त्याकरीता आता मैदानाचा बळी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नव्या प्रस्तावानुसार खेळाच्या मैदानाचे आरक्षण पूर्णत: नामशेष होणार असल्याने त्यास स्थानिक खेळांडूकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
>एक महिन्यात हरकती नोंदवा
महापालिकेच्या आरक्षण बदलाच्या प्रस्तावावर राज्याच्या नगररचना संचालकांनी एक महिन्याच्या ठाणेकरांकडून एक महिन्याच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. या प्रस्तावानुसार खेळाचे मैदानाचे आरक्षण पूर्णत: नामशेष होणार आहे. याबाबतचे नकाशे व फेरबदल प्रस्ताव ठाणे महापालिका आयुक्त कार्यालय, नगररचना उप संचालक कोकण भवन, नवी मुंबई आणि सहाय्यक संचालक जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे उपलब्ध केले आहेत.
>असा आहे महापालिकेचा प्रस्ताव
सध्या दिवा रेल्वे स्थानकानजिकचे क्षेत्र पार्किंग, खेळाचे मैदान आणि विकास योजनेतील २० आणि १० मीटर रुंद रस्त्यांकरीता ं आणि काही भाग निवासी क्षेत्राकरीता आरक्षित आहे. मात्र, नव्या प्रस्तावानुसार या ठिकाणी २० मीटर रस्त्याची आखणी करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे बाधीत होणारे सध्याच्या आरक्षणातील पार्किंग व खेळाचे मैदानाचे क्षेत्र एकत्र करून १० मीटर रस्त्यासह पार्किंगकरीता आरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. तर २० मीटर रस्त्याच्या उत्तरेकडील उरलेले क्षेत्र निवासी भागाकरिता तसेच खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडासह १० मीटर रस्त्याखालील क्षेत्र प्राथमिक शाळेकरिता आरक्षित करण्याचे ठरविले आहे. तर २० मीटर रुंद रस्ता वगळता उरलेले क्षेत्र रेल्वेस देण्यात येणार आहे. या आरक्षण बदलामुळे सध्याच्या आरक्षणातील खेळाचे मैदान पूर्णत: नामशेष होणार आहे. रेल्वेस जागा देण्यापेक्षा त्यांना दिल्या जाणाऱ्या भूखंडावर मैदानाचे आरक्षण ठेवावे, असा काहींचा सूर आहे.