कचरा गाडीतून पडणाऱ्या घाणपाण्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये रहिवाशी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 01:05 PM2019-05-11T13:05:37+5:302019-05-11T13:05:58+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या कचरा उचलणाराया ठेकेदाराच्या कॉम्पॅक्टर व टॅम्पोमधून ओल्या कचऱ्यातले घाणेरडे पाणी रस्त्यावर सांडून दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याच्या समस्याने शहरातील नागरिक त्रस्त आहेत
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या कचरा उचलणाराया ठेकेदाराच्या कॉम्पॅक्टर व टॅम्पोमधून ओल्या कचऱ्यातले घाणेरडे पाणी रस्त्यावर सांडून दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याच्या समस्याने शहरातील नागरिक त्रस्त आहेत. घाण पाण्याचे डाग सुध्दा कायम रहात आहेत. या प्रकरणी भाईंदरच्या बालाजी नगर मधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तर बहुतांश ओला कचरा वेगळा वाहून नेला जात असल्याने कॉम्पॅक्टरमधून कचऱ्यातील घाणपाण्याची धारच लागते.
मीरा भाईंदर शहरात सुरुवातीपासूनच आोला व सुका कचरा एकत्रच नेला जात होता. पण गेल्या तीन- चार वर्षांपासून ओला व सुका कचरा वेगळा करुन त्याची वाहतूक करण्यासाठी पालिकेने नागरिकांना सातत्याने आवाहन केले आहे. कचरा वाहतुकीसाठी ठेकेदारा मार्फत ७ टनाचे ४२ कॉम्पॅक्टर , ३ टनाचे २४ बंदिस्त टॅम्पो तर दिड टनाचे १३ बंदिस्त टॅम्पो वारपले जात आहेत. या शिवाय खुले डंपर सुध्दा रोजचे २५ च्या घरात कचरा वाहतुकीसाठी उपयोगात आणले जात आहेत.
शहरात रोजचा निघणारा सुमारे ५०० टन ओला व सुका कचरा या वाहनांमधून उत्तनच्या धावगी डोंगरावरील कचरा प्रकल्पात नेऊन टाकला जात आहे. ओल्या कचरायाचे वर्गीकरण करुन देण्याचे प्रमाण वाढल्याने पालिकेने ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहनं वापरात आणली आहेत. ओल्या कचरायात घाणपाण्याचे प्रमाण अधिक असल्याने कॉम्पॅक्टर मध्ये ओला कचरा टाकल्यावर तो यांत्रिक पध्दतीने दाबला की आतील घाणपाण्याची धार रस्त्यावरच लागते. त्यामुळे जेथे कचरा भरण्यासाठी कॉम्पॅक्टर थांबवला जातो त्या ठिकाणी हे अतिशय घाण पाणी सांडून परिसरात दुर्गंधी पसरते. या घाणपाण्याचे रस्त्यावर पडलेले डाग सुध्दा निघत नाहीत. याचा रहिवाशी आणि पादचाऱ्यांना खुपच त्रास होत आहे.
कचरा गाडीतील घाणपाण्याच्या गळतीने त्रासलेल्या भाईंदर पश्चिमेच्या बालाजी नगर मधील विजय शर्मा, बजरंग सारडा, रमाकांत पोद्दार, आदेश अग्रवाल, हिरालाल जैन आदी रहिवाशांनी या विरोधात पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. बालाजी नगर मध्ये शाती ज्योतच्या बाजुला, तिरुपती कॉम्पलेक्स समोर तसेच व्यंकटेश प्लाझा आद ठिकाणी इमारतींचा ओला कचरा कॉम्पॅक्टर थांबवून भरला जातो. बराच वेळ कॉम्पेक्टर एकाच जागी उभा असतो. घाणपाणी सांडुन परिसर अस्वच्छ होतोच शिवाय दिवसभर दुर्गंधी कायम असते. रहिवाशांसह पादचाऱ्यांना दुर्गंधी व घाणपाण्याचा त्रास सहन करावा लागतो. नाक मुठीत धरुन रहावे लागतेय. पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करुन नागरिकांची या दुर्गंधीतुन सुटका करावी अशी मागणी केली आहे.