थकबाकी मिळणार असल्याच्या अफवेने कामगारांची दिशाभूल; बनावट व्हॉइस मेसेज तयार करणा-याविरुद्ध कारवाईची युनियनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 05:15 AM2017-10-31T05:15:12+5:302017-10-31T05:15:59+5:30
एनआरसी कंपनीचे दोन हजारांहून अधिक कामगार त्यांच्या थकीत बाकी देण्याच्या प्रतीक्षेत असताना कामगारांची देणी देण्याबाबत मालकासोबत बैठक होऊन डिसेंबर-जानेवारी महिन्यांत कामगारांची देणी दिली जातील.
कल्याण : एनआरसी कंपनीचे दोन हजारांहून अधिक कामगार त्यांच्या थकीत बाकी देण्याच्या प्रतीक्षेत असताना कामगारांची देणी देण्याबाबत मालकासोबत बैठक होऊन डिसेंबर-जानेवारी महिन्यांत कामगारांची देणी दिली जातील, असा दिशाभूल करणारा व्हॉइस मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरत असल्याने कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांशी खेळण्याचा क्रूर प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
व्यवस्थापनाने कंपनीला २००९ साली टाळे ठोकले. कंपनीच्या २ हजार २२५ कामगारांना कंपनीकडून ६५० कोटींचे येणे थकीत आहे. या थकीत येण्यासाठी आॅल इंडिया इंडस्ट्रीयल जनरल्स वर्क युनियनने कंपनी दिवाळीखोरीत गेली, असे जाहीर करा, असा ठराव अलीकडेच केला. याविषयी न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही युनियनने दिला आहे. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने अलीकडेच एक मेळावाही घेण्यात आला. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने २४ आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध केले. या वृत्तापश्चात एका अनोळखी व्यक्तीने दिशाभूल करणारा व्हॉइस मेसेज तयार करून तो व्हॉट्सअॅपवर प्रसारित केला आहे. ही धादांत खोटी माहिती देणारी व्यक्ती कोण आहे, हे कोणाला माहीत नाही. या व्यक्तीचा नंबर ‘ट्रू कॉलर आयडी’वर टाकला असता हा नंबर कुणा सिंग नावाच्या व्यक्तीचा असल्याचे दाखवले जाते. हा सिंग कोण, कुठला. त्याचा एनआरसी कंपनीशी संबंध काय, असे प्रश्न आॅल इंडिया इंडस्ट्रीयल जनरल्स वर्क युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. उदय चौधरी यांनी उपस्थित केले आहेत. मेळाव्यापश्चात कामगारांचा मिळणारा प्रतिसाद आणि आमच्या संघटनेचा सुरू असलेला न्यायलयीन लढा याचे श्रेय हिसकावून घेण्याकरिता पोटदुखी सुरू झालेल्या काही अल्पसंतुष्ट कामगारांचे प्रतिनिधी व प्रतिस्पर्धी कामगार संघटनेच्या गोटातून हा चावटपणा केला गेला आहे, असे चौधरी म्हणाले. या दिशाभूल करणाºया व्हॉइस मेसेजमध्ये कामगारांना तीन हजार कोटींची देणी मिळणार असून त्याबाबतची बैठक गोयंका व जैन यांच्यासोबत झाली आहे. या बैठकीचे इनकॅमेरा चित्रीकरण करण्यात आलेले असून त्याची फीत लवकर यू-ट्यूबवर कामगारांच्या माहितीसाठी टाकली जाणार आहे, असे त्या दिशाभूल करणाºया अनोळखी व्यक्तीने म्हटले आहे. हा मेसेज कामगारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत आहे.
- हा मेसेज सर्वस्वी खोटा आहे. त्यामुळे ज्या मोबाइल नंबरहून हा मेसेज आला आहे. त्याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आहोत. या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कामगारांची दिशाभूल केल्याप्रकरणी सायबर अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.