पाच पाड्यांवर टंचाईचे संकट, पाणीयोजना खर्चिक असल्याने प्रश्न सुटणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:59 AM2019-04-30T00:59:08+5:302019-04-30T00:59:19+5:30
शहापूर तालुक्यातील कळमगाव-कानविंदे-पेंढरी ग्रामपंचायत हद्दीतील गावांत जशी पाणीटंचाई आहे, तशीच ती परिसरातील पाच पाड्यांवरही असून यावर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे
जनार्दन भेरे
भातसानगर : शहापूर तालुक्यातील कळमगाव-कानविंदे-पेंढरी ग्रामपंचायत हद्दीतील गावांत जशी पाणीटंचाई आहे, तशीच ती परिसरातील पाच पाड्यांवरही असून यावर मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.टोकरेपाडा, खरमेपाडा, हेदूचापाडा, चिंचपाडा, दुमाडपाडा हे डोंगरटेकडीवर वसलेले पाच पाडे असून या पाड्यांना जवळपास पाण्याचे काही स्रोतच नाहीत. त्यामुळे त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तानसा धरणाचे बॅक वॉटर येथून जवळपास दोन किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथून पाणीयोजना खर्चिक तसेच जोखमीची असल्याने या पाड्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास बराच अवधी लागणार असल्याचे चित्र आहे. हे पाडे एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर असल्यानेही त्यांना नळपाणीपुरवठा करणे कष्टाचे ठरणार आहे. यंदा पाऊस लवकर गेल्याने तसेच भूगर्भाची पाणीपातळी खोलवर गेल्याने, विहिरीतील पाणी लवकर आटल्याने नेहमीपेक्षा यंदा लवकर टंचाई निर्माण झाली.
शहापूर तालुक्यातील ३२ गावे, ११० पाडे अशा १४२ गावपाड्यांत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून यावर मात करण्यासाठी २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा पुरवठा करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.
तालुक्यातील गावपाड्यांतील लोकसंख्या वाढलेली असल्याने त्यानुसार पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. - एस. भोंडवे, ग्रामपंचायत सदस्य
आज ज्या गावपाड्यांना टंचाई निर्माण झाली आहे, त्या सर्वांचे ठराव आले आहेत. त्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.
- एम.जी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग