दोन डोसमधील अंतर कमी असल्याने रेल्वेने प्रवाशांची कोव्हॅक्सिनला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:43 AM2021-08-22T04:43:06+5:302021-08-22T04:43:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील २० दिवसांत केवळ चार वेळाच लसींचा साठा मिळाला होता. त्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्याला मागील २० दिवसांत केवळ चार वेळाच लसींचा साठा मिळाला होता. त्यानंतर शुक्रवारी एक लाख ४३ हजार आणि शनिवारी पुन्हा कोविशिल्डचा ४३ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता लसीकरण केंद्राबाहेर लस घेण्यासाठी पुन्हा एकदा गर्दी दिसणार आहे. सलग दोन दिवस लसींचा साठा आल्याने आता पुढील तीन ते चार दिवस बिनाब्रेक लसीकरण सुरू राहील अशी चिन्हे आहेत. त्यातही रेल्वे प्रवाशांनी कोव्हॅक्सिनला पसंती दिली आहे. या लसीचा कालावधी हा २८ दिवसांचा असून, कोविशिल्डचा कालावधी हा ८४ दिवसांचा आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लस घेतल्यास बस प्रवासावर होणारा खर्च वाचेल, अशी अपेक्षा व्यक्त करून ही लस मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे.
रेल्वेतून प्रवाशांसाठी दोन्ही डोस घेऊन १४ दिवस झाले असतील अशांनाच रेल्वे पास दिला जात आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातही कोविशिल्ड लस घेतलेल्यांना ८४ दिवसाचा गॅप असल्याने आता जिल्ह्यातील नागरिक कोव्हॅक्सिन लस मिळावी यासाठी धावधाव करीत आहेत. कारण कोव्हॅक्सिनचा दोन डोसचा कालावधी हा २८ दिवसांचा, तर कोविशिल्डचा कालावधी हा जवळजवळ तीन महिन्यांचा आहे.