शिक्षकांच्या कमतरतेमुळे पुरेवाट
By admin | Published: September 5, 2015 02:55 AM2015-09-05T02:55:10+5:302015-09-05T02:55:10+5:30
सोयीसुविधांच्या अभावात विद्यार्थी पटसंख्येला एकीकडे घरघर लागली असताना पुरेसे शिक्षक नसल्याने केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे वास्तव
प्रशांत माने, कल्याण
सोयीसुविधांच्या अभावात विद्यार्थी पटसंख्येला एकीकडे घरघर लागली असताना पुरेसे शिक्षक नसल्याने केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे वास्तव टिटवाळ्यामधील क्रांतिवीर भगतसिंग प्राथमिक विद्यालयात पाहावयास मिळते. महापालिकेची ही गटशाळा असूनही शिक्षण मंडळ प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
या शाळेत मराठी माध्यमाचे शिक्षण दिले जात असले तरी या ठिकाणी बहुभाषिक विद्यार्थी शिकतात. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जात असून येथील पटसंख्या १५४ इतकी आहे. इयत्तांचा आढावा घेता पहिलीत २७, दुसरीत १५, तिसरीमध्ये १२, चौथीत १९, पाचवीत ३८, सहावी १६ तर सातवीमध्ये २७ विद्यार्थी शिकत आहेत. या ठिकाणी दोन बालवाड्या असून येथे ४० मुले शिकत आहेत. ही गटशाळा असून तिच्या अखत्यारीत सहा शाळा आहेत. शाळेची स्थापना १८८५ सालची आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यातून १९९४-९५ ला या शाळेचा ताबा केडीएमसीकडे आला. शाळेला कौलारू छत असून या वास्तूला डागडुजी करण्याची नितांत आवश्यकता आहे. वर्ग खोल्या चार असून त्या प्रशस्त आहेत. विद्यार्थ्यांना बसायला बेंचेस आहेत. परंतु, ते अपुरे आहेत. आणखी बेंचेसची मागणी केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते मिळालेले नाहीत. दोन संगणक आहेत. परंतु, ते नादुरुस्त असल्याने संगणकीय ज्ञानापासून येथील विद्यार्थी वंचित आहेत. विशेष बाब म्हणजे सातवीपर्यंतचे शिक्षण आणि पटसंख्या १५४ इतकी असतानाही या ठिकाणी दोन शिक्षकच नियुक्त केले आहेत. दोन शिक्षकांमध्ये एकावर प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. गटशाळा असल्याने अखत्यारीत असलेल्या सहा शाळांचा कारभार पाहण्याची जबाबदारी उपलब्ध शिक्षकांवर आहे. त्यातच निवडणूकविषयक कामांचा ताणही त्यांच्यावर आहे. वास्तव पाहता आणखी चार ते पाच शिक्षकांची आवश्यकता त्या आभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.