कापड व्यवसायातील मंदीने यंत्रमागमालक हैराण, वीजदरवाढी विरोधात उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 09:56 PM2018-09-20T21:56:38+5:302018-09-20T22:01:02+5:30

Due to slowdown in textile business | कापड व्यवसायातील मंदीने यंत्रमागमालक हैराण, वीजदरवाढी विरोधात उतरणार रस्त्यावर

कापड व्यवसायातील मंदीने यंत्रमागमालक हैराण, वीजदरवाढी विरोधात उतरणार रस्त्यावर

Next
ठळक मुद्देशासनाच्या वीज दरवाढीला विरोधयंत्रमागाच्या संरक्षणासाठी आक्रोश मोर्चायंत्रमागाच्या आरक्षणासाठी राज्यातील व्यापारी येणार एकत्र

भिवंडी: राज्यातील कापड व्यवसाय मंदीच्या खाईत लोटला जात असताना शासनाने वीज दरवाढ केली आहे. त्यामुळे राज्यातील यंत्रमाग मालक व वस्त्रोद्योग उद्योजक हैराण झाले असुन हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर चालला आहे. याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यपातळीवर लवकरच ‘आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात येणार असुन त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र यंत्रमाग समन्वय समितीव्दारा मिटींग आयोजीत केल्या जात आहेत. त्याच निमीत्ताने शहरात पॉवरलूम मालकांची मिटींग संपन्न झाली.
शहरात आणि परिसरांत मिळून सुमारे आठ लाखापेक्षा जास्त यंत्रमाग असुन शासनाने जाहिर केलेल्या योजना आमलात न आल्याने यंत्रमाग मालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच राज्य शासनाने वीज दरवाढ केल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे.व्यवसायाचे जागतिकीकरण व यार्नच्या भावातील अस्थिरता यामुळे स्थानिक कापड उत्पादकांना व व्यावसायीकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने देशांतर्गत कापडाच्या दरापेक्षा कमी दराने परदेशांतून आयात होणाऱ्या कापडावर वाढीव आयात कर आकारावा, सुताचे भाव किमान महिनाभर स्थिर ठेवावेत, सुताची साठेबाजी व काळाबाजारी होऊ नये म्हणून कठोर अंमलबजावणी करावी, हातमागावरील सक्तीचे हँक यार्न रद्द करावे, हॅण्डलूम पॅकेज प्रमाणे पॉवरलूम पॅकेज योजना राबवावी,यंत्रमागासाठी ठरावीक प्रकारचे कापड आरक्षण लागू करावे,अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. तर राज्यात वस्त्रोद्योग घटकासाठी समान दर,सवलत व माफी द्यावी,जाहिर केलेल्या वीज दराच्या सवलतीची अंमलबजावणी करावी,यंत्रमाग खरेदीतील व्याजामध्ये ७ टक्के सवलत लागू करावी, वस्त्रोद्योग धोरणांची अंमलबजावणी करावी,सुताच्या काळ्या बाजारावर कठोर उपाययोजना करावी,अशा विविध मागण्या घेऊन राज्यातील यंत्रमाग धारक रस्त्यावर येणार असुन या मोर्चासाठी शहरातील यंत्रमागधारकांनी पाठिंबा दर्शविला आहे. या आक्रोश मोर्चासाठी शहरातील अंजूरफाटा येथील ओसवाल वाडी हॉल येथे यंत्रमाग मालकांची मिटींग आयोजीत केली होती. या मिटींगसाठी महाराष्ट्र यंत्रमाग समन्वय समितीचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी आक्रोश मोर्चाची भूमीका सर्वांना पटवून सांगीतली. तर आयोजक महाराष्ट्र स्टेट पॉवरलूम फेडरेशनचे अध्यक्ष फौजान आझमी यांनी मोर्चाला पाठिंबा जाहिर केला. इचलकरंजीचे यंत्रमाग मालक पुंडलीक जाधव,वीटाचे यंत्रमाग मालक किरण तारडेकर,राजू मुठाणे, माजी आमदार रशीद ताहिर,काँग्रेस प्रदेश सरचिटणीस फाजील अन्सारी,पद्मानगर पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष पुरषोत्तम वंगा, आमदार रूपेश म्हात्रे, माजी आमदार मोहम्मद अली खान, हालारी ओसवाल पॉवरलूम असोसिएशनचे रतीलाल सुमरिया आदिंनी आपापले विचार मांडून संघटीत होऊन हा संघर्ष करावयाची तयारी दाखविली. तसेच त्यांनी पॉवरलुम उद्योगाला चालना देण्याच्या अनुषंगाने विचार मांडले आणि शासनाकडून या उद्योगासाठी सोयी सवलती मिळविण्यासाठी चर्चा केली. शहरातील विविध भागातून यंत्रमाग मालक व कापड व्यापारी या मिटींगसाठी उपस्थित होते.

Web Title: Due to slowdown in textile business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.