पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 01:23 AM2019-06-23T01:23:20+5:302019-06-23T01:23:37+5:30
पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पेरणी केलेली भातरोपे करपून दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.
वासिंद : पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पेरणी केलेली भातरोपे करपून दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.
ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. यंदा पावसाने जूनच्या सुरुवातीला हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी आनंदाने भातपेरणीची कामे उरकली. मात्र, सध्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पेरणी केलेली भातरोपे करपण्याची व योग्य प्रमाणात न उगवण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. त्यांना आर्थिक भार सोसावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानाने, तर काही कृषी केंद्रांतून अधिक किमतीचे आपल्या आवडीनुसार दप्तरी, जोरदार, शबरी, कर्जत असे हलवार, तर सुवर्णा, मसुरी, कर्जत-७ अशी भात बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. एकीकडे भात बियाणे, शेतमजूर, यंत्रसामग्री ही महागाईची ठरत असतानाही काही हौशी, मेहनती शेतकरी अद्यापही शेती करत आहेत.
पावसाचे संकेत दिसताच शेतकºयांनी पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने जमिनीवर जो दाणा राहिला आहे, त्याची पावडर होईल व त्यातच जमिनीत कमी प्रमाणात गेलेला भात हा उगवताना जोमदार नसेल, त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवेल.
- प्रा. प्रकाश भांगरथ, कृषी तंत्र