आजदे तलावात अचानक आॅक्सिजन वाढला तेव्हा...
By admin | Published: December 23, 2015 12:35 AM2015-12-23T00:35:26+5:302015-12-23T00:35:26+5:30
वाढलेल्या प्रदूषणामुळे औद्योगिक निवासी परिसरातील नैसर्गिक आजदे तलावात आॅक्सिजनचे प्रमाण शून्य असल्याचा खळबळजनक अहवाल सोमय्या पर्यावरण
डोंबिवली : वाढलेल्या प्रदूषणामुळे औद्योगिक निवासी परिसरातील नैसर्गिक आजदे तलावात आॅक्सिजनचे प्रमाण शून्य असल्याचा खळबळजनक अहवाल सोमय्या पर्यावरण प्रयोगशाळेतून आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र नेमका उलटा अहवाल दिला आहे. त्यांच्या अहवालात आॅक्सिजनचे प्रमाण मात्र झपाट्याने वाढल्याने या व्यवस्थेला नेमका कसा आणि कुठे ‘आॅक्सिजन’ मिळाला, त्याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. नेमका कोणाचा अहवाल खरा मानायचा, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
नैसर्गिक पाण्याच्या झऱ्यामुळे आजदे तलाव प्रसिद्ध आहे. या तलावात गणेशोत्सवात गणेश मूर्तीचे, तर नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तींचे विसर्जन झाले. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या या मूर्तींमुळे तलाव इतका प्रदूषित झाला, की आॅक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. त्यातून आॅक्टोबरमध्ये तलावातील मासे मरुन पडले.
त्यामुळे या भागातील सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी प्रदूषण मंडळाकडे धाव घेतली. मंडळाने पाण्याचे नमुने घेतले. त्यांचा अहवाल लवकर येत नसल्याने नलावडे यांनी सोमय्या कॉलेजच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडे पाण्याचे नमुने तपासायला दिले होते.
त्याचबरोबर विरारच्या विवा या खाजगी प्रयोगशाळेतही ते तपासण्यात आले. विवा व सोमय्यातून आलेल्या अहवालात पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण शून्य असल्याचे आढळून आले. शास्त्रीय निकषानुसार ते चार मिलीग्र्रॅम आवश्यक होते. सर्वात उशिरा आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात मात्र हे प्रमाण ३.२ मिलीग्रॅम आढळले. जर हा अहवाल खरा असेल तर मग मासे का मरण पावले, असा सवाल नलावडे यांनी केला आहे.