कडेकोट बंदोबस्तात कार्यकर्त्यांची कोंडी
By Admin | Published: February 24, 2017 07:31 AM2017-02-24T07:31:40+5:302017-02-24T07:31:40+5:30
वर्तकनगर येथील महिला बचत गट इमारतीमध्ये मतमोजणी असल्याने या भागात
ठाणे : वर्तकनगर येथील महिला बचत गट इमारतीमध्ये मतमोजणी असल्याने या भागात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. त्यामुळे अतिउत्साही कार्यकर्त्यांना पोलिसांनी मतमोजणी केंद्रापासून लांब ठेवले होते. मात्र, मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींना केलेली मोबाइलबंदी आणि कूर्मगतीने बाहेर येणारे निकाल यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली.
सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार असल्यामुळे दोन तास आधीच वर्तकनगर ते लोकमान्यनगर पाडा क्रमांक-२ कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. या इमारतीकडे येण्यासाठी एका बाजूला अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर वाहने लावावी लागत होती. दुसऱ्या बाजूलाही अर्धा किलोमीटर दूरपासून रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यातून मतमोजणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा असूनही कूर्मगतीने काम सुरू होते. एका प्रभागाचा निकाल दोनदोन तास लागत नव्हता. त्यामुळे दोनदोन प्रभागांचे कार्यकर्ते एकाच वेळी मोठ्या प्रमाणात या परिसरात जमा झाले होते. सुरुवातीला प्रभाग ६ मधील राष्ट्रवादीचे चारही उमेदवार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर, प्रभाग १३ मधून शिवसेनेच्या चारही उमेदवारांचे पॅनल जिंकले आणि भगवे झेंडे घेऊन हा परिसर शिवसैनिकांनी जल्लोषाने दणाणला होता. (प्रतिनिधी)
पोलीसही ताटकळले...
मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार होती; मात्र पोलिसांचा बंदोबस्त सकाळी ६ वाजतापासूनच लावण्यात आला होता. त्यामुळे आधीचे चार तास आणि मतमोजणी सुरू झाल्यानंतर सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत म्हणजे सलग १२ ते १३ तास पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी ताटकळले होते. अनेकांना तर जेवणही वेळेत न मिळाल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली.