प्रशासनाच्या उदासिनतेमुळे स्वखर्चाने शहापूरच्या खंडवीचीवाडीची लघू नळपाणी पुरवठा योजना
By सुरेश लोखंडे | Published: February 20, 2024 03:38 PM2024-02-20T15:38:46+5:302024-02-20T15:38:58+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या लघू नळपाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण सोहळा शहापूर,मुरबाड व वाडा येथील प्रगत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जल्लाेषात पार पडला.
ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागामधील टाकीपठार जवळील आपटे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील खंडवीचीवाडी या १५० लोकसंख्येच्या आदिवासी लाेकवस्तीच्या पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, ग्राम पंचायत आदी प्रशासनाकडे वेळाेवेळी पाठपुरावा केला. पण या प्रशासनाच्या उदासिनतेला कंटाळून सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी स्वखर्चाने लघू नळपाणी योजना सुरू करून या गांवकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केली. त्यामुळे येथील जाणकार नागरिक, ग्रामस्थ आणि गृहिणींनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या यशस्वी नळ पाणी पुरवठा याेजने आधी हरणे यांनी जवळच्या ३७८ लाेकवस्तीच्या शेणवे गावातील स्मशानभूमीची दुरवस्था पाहून तत्काळ त्या स्मशानभूमीवर पत्र्यांचा शेड उभारून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या लघू नळपाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण सोहळा शहापूर,मुरबाड व वाडा येथील प्रगत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जल्लाेषात पार पडला. पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केल्याने श्रीक्षेत्र टाकेश्वर मठाचे मठाधिपती योगी फुलनाथजी महाराज यांनी हरणे यांचे कौतुक करुन शुभाशीर्वाद दिले. या याेजनेच्या लाेकार्पण साेहळ्याला जेष्ठ गणपत खंडवी, सोमा खंडवी, योगिता खंडवी, शरद शिद, योगेश खंडवी, दौलत खंडवी, मधुकर हरणे, आत्माराम मिरकुटे, पांडुरंग पाटेकर, विलास धानके, विनोद पाटील, किशोर चौधरी, चंद्रकांत मते, विश्वनाथ धुमाळ, सचिन पाटील, विश्वनाथ जाधव, रमेश हरणे आदी मान्यवर उपस्थित होते.