पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2024 06:01 AM2024-10-06T06:01:05+5:302024-10-06T06:01:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक मार्गात बदल केला होता. परिणामी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर साधारण ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबईहून नाशिकला किंवा नाशिकहून मुंबईला येताना दररोज हजारो अवजड वाहने मोटारी, रिक्षा, स्कूटर या छोट्या प्रवासी वाहनांची कोंडी करतात. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोडबंदर रोडवरील मैदानात सभा असल्याने तब्बल तीन हजार अवजड वाहने मुंबई-नाशिक महामार्गासह घाेडबंदर राेडवर थांबवून ठेवल्याने या अवजड वाहनांना वाकुल्या दाखवत माेटार, दुचाकीवरून नागरिकांनी सुसाट व सुखद प्रवासाचा अनुभव घेतला.
पंतप्रधानांच्या सभेसाठी ठाणे शहर पाेलिस आयुक्तालयातील अनेक मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आधीच दिली हाेती. ठाणे शहर वाहतूक विभागात तीन राष्ट्रीय महामार्ग, तर एक राज्य महामार्गावरील अवजड वाहने शुक्रवारी रात्रीपासून ठिकठिकाणी थांबवून ठेवली. गुजरात, मुंबईकडून घोडबंदर रोडमार्गे तसेच नाशिक, भिवंडीकडून नवी मुंबई, जेएनपीटीकडे आणि पश्चिम महाराष्ट्रात मालवाहतूक करणारी ही वाहने शहापूर, पडघा परिसरात महामार्गावरील माेकळ्या ठिकाणी थांबवून ठेवली हाेती. मुंब्रा बायपास आणि सरावली दरम्यान ही अवजड मालवाहू वाहने थांबवण्यात आली हाेती. घाेडबंदर राेडवरील वाहने वसई परिसरातील चिंचाेटी, कामनजवळ अडवण्यात आली हाेती. ठाणे शहराजवळील फाऊंटन हाॅटेलजवळ वाहने थांबवून ठेवली हाेती.
पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतरही शनिवारी रात्री १२ नंतर ही रोखलेली तीन हजार वाहने संध्याकाळी ७.३० नंतर ही अडकवून ठेवलेली वाहने साेडण्यात आली. त्यामुळे रात्री नऊ नंतर वाहतूककोंडी झाली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई, ठाण्याच्या दौऱ्यामुळे ठाणे व मुंबईत जाणाऱ्या वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल केला होता. परिणामी या वाहतूक बदलामुळे शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पुलापासून ते शिरसाड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. साधारण ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. या वाहतूक काेंडीमुळे बाहेरगावी तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले. पालघर जिल्ह्यात विविध देवींच्या दर्शनासाठी निघालेल्या पर्यटकांनाही कोंडीचा फटका बसला. मुंबई-ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वर्सोवा पूल ते चिंचोटी या दरम्यान वाहनांच्या रांगा दिसल्या.
नवी मुंबई-ठाणे रस्ता दिवसभर मोकळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यामुळे अवजड वाहनांना बंदी घातल्याने नवी मुंबई ते ठाणेकडे जाणारे रस्ते दिवसभर मोकळे दिसून आले. अनेक मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले होते. जेएनपीटी चौक कर्जत मुरबाड शहापूर कसारा-इगतपुरी नाशिककडे जाण्यासाठी मार्गात बदल करण्यात आला होता. जेएनपीटी चौक कर्जत, मुरबाड, शहापूर, वाडा, मनोर टोल नाका येथून गुजरातमार्गे तसेच जेएनपीटी पुणे एक्स्प्रेसमार्गे चाकण, नगर, नाशिक हायवेमार्गे इच्छित स्थळी जाण्यास वाहनांना मुभा देण्यात आली होती.
सभेवेळी १४५ जणांना त्रास
ठाण्यात शनिवारी दुपारी आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळी काही महिला आणि पुरुषांना रक्तदाब कमी होणे अथवा वाढणे आणि चक्कर येणे असा त्रास झाला. आरोग्य यंत्रणेमार्फत १४५ जणांवर तत्काळ उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी सोडले. घोडबंदर भागातील बोरीवडे येथे मोदींच्या कार्यक्रमासाठी दोन हजार वाहनांमधून सुमारे एक लाख नागरिक आले होते. येणाऱ्यांना जेवणाचे पाकीट, पाणी देण्यात आले. येथे मोठा तंबू बांधला होता. त्यात हवा खेळती राहील, याची व्यवस्था होती. तरी काहींना त्रास झाला. त्यांना ओआरएसमिश्रित पाणी दिल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.