मातब्बर नेत्यांच्या सभांमुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष, मुरबाडमध्ये किसन कथोरे यांची भूमिका महत्त्वाची

By नितीन पंडित | Published: May 22, 2024 04:12 PM2024-05-22T16:12:37+5:302024-05-22T16:13:30+5:30

पाटलांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या डझनभर मंत्र्यांनी प्रचार केला. शरद पवार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बाळ्यामामा यांच्यासाठी सभा घेतली. संपूर्ण देशात ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

Due to the meetings of the senior leaders, the entire state's attention is focused on the results, the role of Kisan Kathore is important in Murbad | मातब्बर नेत्यांच्या सभांमुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष, मुरबाडमध्ये किसन कथोरे यांची भूमिका महत्त्वाची

मातब्बर नेत्यांच्या सभांमुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष, मुरबाडमध्ये किसन कथोरे यांची भूमिका महत्त्वाची

 

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी ग्रामीण व शहापूर विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ७२.६६ टक्के, तर ७०.२८ टक्के मतदान झाले असून त्या तुलनेत भिवंडी पूर्व व पश्चिम, कल्याण पश्चिम या मतदारसंघात कमी मतदान झालेले आहे. हे वाढीव मतदान महायुतीचे उमेदवार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुन्हा तिसऱ्यांदा दिल्लीत धाडणार की महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा व अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांच्यापैकी काेण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

पाटील तिसऱ्यांदा रिंगणात उतरल्यानंतर काँग्रेसच्या ताब्यातील हा मतदारसंघ शरद पवार गटाने आपल्याकडे खेचून घेतला. पाटलांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या डझनभर मंत्र्यांनी प्रचार केला. शरद पवार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बाळ्यामामा यांच्यासाठी सभा घेतली. संपूर्ण देशात ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

 भिवंडी लोकसभेत ५९.८९ टक्के मतदान झाले. विधानसभानिहाय मतांच्या आकडेवारीनुसार, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ७२.६६ टक्के, शहापूर ७०.२८ टक्के, भिवंडी पश्चिम ५५.१७ टक्के, भिवंडी पूर्व ४९.८७ टक्के, कल्याण पश्चिम ५२.९८ टक्के, तर मुरबाड मतदारसंघात ६१.१२ टक्के मतदान झाले आहे.

भिवंडी लोकसभेच्या मतदानाच्या वेळी भिवंडी पूर्वेतील मुस्लिमबहुल मतदान केंद्रांवर सुरू असलेल्या मतदानावेळी पाटील यांचा पारा चढला. त्यांनी अधिकाऱ्यांवर तिखट शब्दांत टीका केली. त्यामुळे काही भागात अचानक वाढलेले मतदान व काही भागांत त्या तुलनेत कमी झालेले मतदान यामुळे पाटील नाराज झाले किंवा कसे, असा प्रश्न भिवंडीतील मतदार करत आहेत. 

भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत असून पाटील व म्हात्रे हे दोन्ही आगरी समाजातील उमेदवार आहेत. त्याचवेळी अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे हे कुणबी समाजातील आहेत. शहापूर परिसरात कुणबी समाजाचे लक्षणीय मतदान आहे. तेथील मतांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे कुणबी मतदारांचे एकगठ्ठा मतदान झाले किंवा कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. 

मुरबाड या भाजप आमदार किसन कथोरे यांच्या विधानसभा मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाले. पाटील यांच्याकरिता मुरबाड मतदारसंघात ठाण मांडू, असे कथोरे यांनी जाहीर केले होते. भिवंडी पूर्व-पश्चिम व कल्याण पश्चिमच्या तुलनेत मुरबाडमध्ये जास्त मतदान झाले आहे.

 हे मतदान कथोरे यांच्या प्रयत्नांचे फलित आहे की गेले काही महिने गाजत असलेल्या पाटील व कथोरे वादाचे फलित आहे, अशी चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात सुरू झाली आहे. 

  विधानसभानिहाय मतदान 
मतदारसंघ      २०१९    २०२४       
भिवंडी ग्रामीण     १,८५,९५०     २,३५,४११    
शहापूर     १,४८,०६९     १,९१,६१९    
भिवंडी पश्चिम     १,३६,७८५     १,६८,२४५    
भिवंडी पूर्व     १,२४,४२५    १,६७,६१५     
कल्याण पश्चिम     १,८८,५९७     २,११,९८३    
मुरबाड     २१९०६२    २७०७०३    
एकूण      १०,०२,८८८    १२,५०,०७६     
 

Web Title: Due to the meetings of the senior leaders, the entire state's attention is focused on the results, the role of Kisan Kathore is important in Murbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.