पालिकेच्या हलगर्जीपणा मुळे मीरारोड मध्ये कचऱ्याला आग लागून झाडे जळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:49 PM2022-04-04T19:49:39+5:302022-04-04T19:49:57+5:30
मीरारोड पूर्वेकडील इंद्रलोक फेस ६ परिसरात पालिके मार्फत हरितक्रांती योजना अंतर्गत लावण्यात आलेली काही झाडे तेथे टाकलेल्या कचऱ्यास आग लागल्यामुळे जळाली.
मीरारोड - मीरारोड पूर्वेकडील इंद्रलोक फेस ६ परिसरात पालिके मार्फत हरितक्रांती योजना अंतर्गत लावण्यात आलेली काही झाडे तेथे टाकलेल्या कचऱ्यास आग लागल्या मुळे जळाली. येथील मीनाताई ठाकरे सभागृह परिसरात असलेल्या महापालिकेच्या मोकळ्या जागेत शासनाच्या हरितक्रांती योजने अंतर्गत झाडांची लागवड केली गेली होती.
या ठिकाणी झाडांची लागवड केली गेली असताना परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी साहजिकच पालिकेची आहे. परंतु तसे असताना या ठिकाणी बेकायदेशीरपणे कचरा, डेब्रिस आदी आणून टाकले जाते. त्या साचलेल्या कचऱ्यास आग लागण्याची घटना रविवारी घडली. आग इतकी भडकली की, तेथे असलेल्या पालिकेच्या काही झाडांना आगीची झळ बसून काही झाडे जळाली. अग्निशमन दलाने जाऊन आग आटोक्यात आणली.
एरवी स्वच्छता सर्वेक्षण असले की, शहरात स्वच्छतेचा ढोल बडवणाऱ्या महापालिकेकडून उघड्यावर बेकायदा टाकला जाणारा कचरा आणि तो टाकणाऱ्यांकडे काणाडोळा केला आहे. कचरा - डेब्रिस टाकणाऱ्यांवर पालिकेने लक्ष ठेऊन ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ स्वच्छ सर्वेक्षण पुरते स्वच्छतेचा गवगवा करून चालणार नाही. पालिकेच्या हलगर्जीपणा मुळे कचरा साचून आग लागल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.