पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण
By अजित मांडके | Published: March 1, 2023 10:14 PM2023-03-01T22:14:17+5:302023-03-01T22:15:39+5:30
राबोडी पोलिसांची कामगिरी: पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राबोडी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे गळफास घेतलेल्या तरुणाचे प्राण वाचू शकल्याची घटना मंगळवारी रात्री उघड झाली आहे. ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनंतर क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन या विबोध दत्ताराम जाधव (२६, रा. अग्रसेन टॉवर, ठाणे) याचे प्राण वाचविणाºया राबोडी पोलिसांचे शहरात कौतुक होत आहे.
एरव्ही, चोरी, खून, दरोडा आणि आत्महत्येची घटना घडल्यानंतर पोलिस पोहचतात. त्यातनंतर चौकशी आणि तपास सुरु होतो. हे सर्वश्रुत आहे. परंतू, ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाने एक तरुण आत्महत्येच्या तयारीत असल्याची माहिती दिल्यानंतर वायूवेगाने जात या तरुणाला पोलिसांनी अक्षरश: मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. अगसेन टॉवरमधील पाचव्या मजल्यावरील ५०४ क्रमांकाच्या घरात विबोध हा तरुण आत्महत्या करीत असल्याची माहिती ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता सुमारास मिळाली होती. नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी हीच माहिती तातडीने राबोडी पोलिसांना दिली. त्यानुसार रात्र पाळीतील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस हवालदार तडवी, पोलिस नाईक पाटील, अंमलदार घडशी आणि बिट मार्शल अंमलदार यादव आणि पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
तेंव्हा घराला आतून कडी लावलेली आढळली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस पथकाने आजूबाजूच्या रहिवाशांकडे विचारपूस करीत या सदनिकेची चावी मिळविली. तातडीने त्यांनी या घराचा दरवाजा उघडला. तेंव्हा विबोध हा पंख्याला फास लावून घेत असल्याचे आढळले. त्याला त्यांनी तातडीने खाली घेऊन त्याच्या गळ्यातील दोरी काढली. त्यानंतर त्याच्या वडिलांना ही माहिती देण्यात आली. त्याचे वडिल हे सत्संगाला तर आई मुंबई येथे नोकरीनिमित्त बाहेर गेल्याचे त्याने सांगितले. वडीलही तातडीने घरी पोहचले. त्यानंतर या प्रकाराची माहिती देऊन मुलाला वडिलांच्या ताब्यात दिल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले. तत्परतेने घटनास्थळी जाऊन या तरुणाचे प्राण वाचविणाऱ्या पोलिस पथकाचे घाटेकर यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी कौतुक केले. या घटनेचा व्हिडिओ २८ फेब्रुवारी रोजी आणि १ मार्च रोजी व्हायरल झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"