वाहतूक कोंडीने ठाणेकर मेटाकुटीला, पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी लागतोय पाऊण तास
By अजित मांडके | Published: January 6, 2024 05:12 PM2024-01-06T17:12:38+5:302024-01-06T17:13:05+5:30
ठाणेकरांना वाहतुक कोंडी ही केवळ पावसाळ्यापुर्ती मर्यादीत राहिलेली नसून ती आता नित्याचीच झाल्याचे चित्र दिसत आहे.
ठाणे : वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतुक पोलिसांनी विविध प्रयोग मागील काही महिन्यात ठाण्यात केले आहेत. मात्र हे सर्वच प्रयोग सपशेल फेल झाल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसत आहे. माजिवडा पासून ते थेट पातीलपाड्यापर्यंत रोजच्या वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यातही मानपाडा ते माजिवडा हे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तासांचा कालवधी जात असल्याचे चित्र आहे. दुपारी १२ नंतर ते रात्री १० वाजेपर्यंत या भागात सतत वाहतुक कोंडीचा जाच ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हेच ठाणे बदलतय का? असा उपरोधीक सवाल ठाणेकर नागरिक करु लागले आहेत.
ठाणेकरांना वाहतुक कोंडी ही केवळ पावसाळ्यापुर्ती मर्यादीत राहिलेली नसून ती आता नित्याचीच झाल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडल्यावर वाहतुक कोंडी होत होती. मात्र आता रस्ते चकाचक असतांनाही रस्त्यांवर वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. कापुरबावडी, माजिवडा, गोकुळनगर, नाशिककडून माजिवड्याकडून येणाऱ्या मार्गावर मानपाडा ते कापुरबावडी, माजिवडा ते मानपाडा ही सध्या वाहतुक कोंडीचे मुख्य स्पॉट ठरत आहेत. सकाळच्या सत्रात तुम्हाला कोंडीचा जाच नसला तरी देखील दुपारी १२ नंतर मात्र तुम्हाला घोडबंदरला किंवा ठाण्याला यायचे असेल तर विचार करुनच निघा अन्यथा कापुरबावडी ते माजिवडा या अवघ्या एका मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तांसाचा कालावधी जात आहे.
त्यात संध्याकाळ जर तुम्ही थकून भागून आणि रेल्वेच्या गर्दीत चेंगरुन आल्यानंतर सुखाने घरी जाण्याचा किंबहुना घोडबंदरला जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी वाहतुक कोंडीत रममाण होण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे, स्टेशनवरुन परिवहनची बस पकडल्यानंतर घोडबंदरला किंबहुना मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ या भागात जायचे असले तर त्यासाठी कमीत कमी दोन तासांचा कालावधी सांयकाळी ६ नंतर रात्री १० वाजेपर्यंत लागत असल्याचे चित्र आहे. त्यातही गोकुळ नगर ते कापुरबावडी हे अंतर कापण्यासाठी पाच मिनिटांचा देखील अवधी लागत नाही. मात्र सांयकाळी हेच अंतर कापण्यासाठी ३५ ते ४५ मिनिटांचा कालावधी खर्ची करावा लागत आहे. त्यात कोंडीत अडकल्यावर विविध स्वरुपाच्या वाजणाºया वाहनांच्या हॉर्नमुळे डोकेदुखी देखील वाढत असल्याचे चित्र आहे.
मानपाडा भागात मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्त्याच्या मधोमध पिलर उभारण्यात आले आहेत, त्यामुळे घोडबंदरकडे जातांना आणि ठाण्याकडे येतांना वाहतुकीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. त्यात आता कापुरबावडी नाक्यावर छोट्या पुलाच्या ठिकाणी देखील मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथे देखील वाहतुक धिमी झाली आहे. त्यामुळे सांयकाळच्या सुमारास याच भागात मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आणखी किती दिवस त्रास सहन करायचा असा सवाल ठाणेकर करु लागले आहेत.