मुंब्य्रातील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमुळे केंद्राचा ३९ कोटींचा महसूल बुडाला
By जितेंद्र कालेकर | Published: August 19, 2018 11:30 PM2018-08-19T23:30:45+5:302018-08-19T23:30:45+5:30
अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमुळे केंद्र शासनाचा तब्बल ३९ कोटींचा महसूल बुडाल्याची बाब समोर आली आहे. मुंब्य्राचे हे एक्स्चेंज चालविण्यासाठी दुबईतून आयपी अॅड्रेस आणि पासवर्ड दिल्यानंतरच ते कार्यान्वित होत होते.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंब्य्रातील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमुळे केंद्र शासनाचा तब्बल ३९ कोटींचा महसूल बुडाल्याची बाब केंद्रीय दूरसंचार विभागाच्या तपासणीत समोर आली आहे. यामध्ये अटक केलेल्या शेहजाद शेख याच्यासह तिघांच्याही पोलीस कोठडीत ठाणे न्यायालयाने २२ आॅगस्टपर्यंत वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंब्य्रातील कौसा भागातील ‘कादर पॅलेस’मधील वेगवेगळ्या इमारतीमधील शेहजाद शेख, शकील शेख आणि मोहंमद खान या तिघांना १३ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर, अरुण क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत क्षीरसागर आणि उपनिरीक्षक अजित बडे आदींच्या पथकाने अटक केली. त्यांचा चौथा साथीदार वसीलउल्ला शेख हा अजूनही पसार आहे. या टोळीने निवासी इमारतीमधूनच अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज सुरू केले होते. त्यांच्याकडील ‘खाचा’ सीमकार्ड कार्यान्वित झाल्यापासून ते या टेलिफोन केंद्रावर धाड पडेपर्यंत दूरसंचार निगम विभागाचा किती महसूल बुडाला, याची चाचपणी केंद्रीय अधिकाऱ्यांनी मुंब्य्रातील या एक्स्चेंजमधून मिळालेल्या सामग्रीच्या आधारे केली. त्यावेळी ३९ कोटींचा महसूल बुडाल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींच्या घरातून १९ सीम बॉक्स मशीन, ३७ वायफाय राउटर, २९१ सीमकार्ड अशी इलेक्ट्रॉनिक सामग्री हस्तगत केली आहे. याच सामग्रीच्या आधारे हे विश्लेषण केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.
......................................
पासवर्ड मिळायचा दुबईतून
मुंब्य्राचे हे एक्स्चेंज चालवण्यासाठी समीर नावाची व्यक्ती दुबईतून आयपी अॅड्रेस आणि पासवर्ड द्यायची. त्यानंतरच, हे एक्स्चेंज कार्यान्वित होत होते.
......................................
काय असते ‘खाचा’ सीमकार्ड?
बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डचा वापर करून वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांमधून काही सीमकार्ड मिळवून कार्यान्वित केले जायचे, ते ‘खाचा’ कार्ड म्हणून ओळखले जात होते. याच खाचा कार्डची विक्री हे एक्स्चेंज चालवणा-यांना १२०० रुपयांमध्ये केली जात होती. भिवंडीत पोलिसांनी अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजवर धाड टाकल्यानंतर असे खाचा कार्ड पुरवणारे वितरक गायब झाले होते. त्यामुळेच मुंब्य्रातील हे एक्स्चेंजही काही महिने बंद होते. अलीकडेच ते सुरू झाले होते. त्याची खबर मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी धाड टाकली. या धाडीनंतर पुन्हा हे वितरक गायब झाल्याची बाब तपासात समोर आली आहे. या खाचा सीमकार्डवरून संबंधित कार्डधारकाचा शोध घ्यायचा झाल्यास कार्डधारकाचा पत्ता किंवा कोणतीही माहिती खोटी आढळते. त्यामुळे त्याआधारे पोलिसांना कोणताच शोध घेता येत नाही. त्यामुळेच एरव्ही १०० ते १५० रुपयांमध्ये मिळणारे हे खाचा सीमकार्ड चढ्या भावाने म्हणजे अगदी १२०० ते १५०० रुपयांपर्यंतही विकले जाते, असेही या अधिकाºयाने सांगितले.
........................