पक्षाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे मनसैनिक द्विधा मन:स्थितीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:55 AM2019-04-15T00:55:22+5:302019-04-15T00:55:50+5:30
कल्याण-डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता प्रचार नेमका कुणाचा करायचा, याबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत
कल्याण : आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना विरोध आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे सभांमधून सांगत असल्याने कल्याण-डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता प्रचार नेमका कुणाचा करायचा, याबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत. मनसेतील जुन्या शिवसैनिकांचे मन राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करायला धजावत नाही आणि आगरी समाजातील मनसैनिक यांना जातीच्या आधारे राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे ओढा असल्याने मनसेमध्ये दोन गट पडल्याची कबुली सूत्रांनी दिली आहे.
लोकसभेच्या २००९ अथवा २०१४ च्या निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून मनसेचे उमेदवार रिंगणात होते. लाखोंच्या आसपास मनसेला मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात मनसेची लाखभर मते आहेत, हे नाकारून चालणार नाही. राज ठाकरे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. मनसेचा प्रचार मोदी आणि शहांविरोधात असेल, असे राज यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, थेट कुणाचा प्रचार करा, असे त्यांनी सांगितले नसल्यानेच मनसैनिक आपापल्या सोयीनुसार कुणाचा प्रचार करायचा, याचा अर्थ लावत आहेत. त्याचबरोबर ठाकरे यांनी विधानसभेची तयारी सुरू करा, असेही सूचित केल्याने ते गणित डोळ्यांसमोर ठेवून मनसैनिक कुणाला पाठिंबा द्यायचा, याचे सोयीस्कर आराखडे तयार करत आहेत. ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या संदिग्ध भूमिकेमुळे कल्याण, डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
दरम्यान, अलीकडेच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी मनसे १०० टक्केआमच्यासोबत आहे, असे वक्तव्य केले आहे. पाटील हे उमेदवारी अर्ज भरताना काढण्यात आलेल्या रॅलीत मनसेचे माजी परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे हे सहभागी झाले होते. अन्य कोणताही मनसेचा पदाधिकारी रॅलीत सहभागी नव्हता. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून ते भूमिपुत्र असल्याच्या मुद्याकडे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे म्हात्रे यांची रॅलीतील उपस्थिती ही ‘भूमिपुत्र’ उमेदवाराला पाठिंबा या हेतूने असल्याची चर्चा झाली होती. मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष मनोज घरत यांनीही मोदी सरकार पाडण्यासाठी जेजे आवश्यक असेल, तेते सगळे केले जाईल, आम्ही मनसे स्टाइलने प्रचार करू, असे सूचक वक्तव्य केले आहे. आमच्या प्रचाराचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही, असे स्पष्ट केल्याचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांचे म्हणणे आहे. ही मनसेमधील वेगवेगळी मते चर्चेचा विषय ठरली आहेत.
मनसेमध्ये काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिवसेनेतून आलेले आहेत. ते कट्टर हिंदुत्ववादी असल्याने त्यांचे मन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला तयार नाही. त्यापैकी काही कल्याण मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही, अशी सोयीस्कर भूमिका घेत आहेत, तर आगरी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोदीविरोधाबरोबरच समाजातील उमेदवार हा निकष लावत आहे.
।मी कोणत्या समाजाचा आहे, हा भाग वेगळा, पण जेव्हा नेते स्पष्टपणे सांगतात, आपला प्रचार मोदी आणि शहा यांच्याविरोधात आहे, तेव्हा अप्रत्यक्षरीत्या का होईना दिलेल्या आदेशानुसार बाबाजी पाटील यांच्या रॅलीत सहभागी झालो होतो.
- प्रल्हाद म्हात्रे, माजी परिवहन सदस्य, मनसे
>मोदी आणि शहांविरोधात जे लढताहेत, त्यांना आमचा पाठिंबा असणार आहे. ज्यांना फायदा व्हायचा असेल त्यांना होऊ द्या, असे गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी सांगितले आहे. कल्याण लोकसभेत आम्ही मोदी आणि शहांच्या विरोधात प्रचार करणार, त्याचा फायदा बाबाजी पाटील यांना होणार, असे वक्तव्य मी केले आहे.
- मनोज घरत, कल्याण ग्रामीण, विधानसभा अध्यक्ष
>राज ठाकरे यांनी नांदेडच्या सभेत स्पष्टपणे भूमिका जाहीर केली आहे. मी कोणाच्या प्रचारासाठी आलेलो नाही. मोदी आणि शहा यांना विरोध म्हणून मी माझी स्वत:ची भूमिका मांडतोय, असे ठाकरे यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे आमची भूमिका राहील.
- राजेश कदम, मनसे प्रदेश उपाध्यक्ष