नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकावर कार आदळून ठाण्यात दोघांचा मृत्यु: चालकासह चौघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 08:23 PM2019-01-31T20:23:49+5:302019-01-31T20:29:46+5:30
एका हळदीच्या समारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेले मित्र कोलशेत येथील पाणीपुरी खाण्यासाठी जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका कारमधील दोघांचा मृत्यु तर चोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यात घडली.
ठाणे: चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकावर कार आदळून झालेल्या अपघातामध्ये अंकुश चांदवडे (२८)आणि अर्जून श्रीपथ पारधी (३२)या दोघांचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये चालक शैलेश पाटील (३६) यांच्यासह संजीव जेस्वाल (३३), दिपक कांबळे (३६) आणि जगदीश सलुजा उर्फ राजू चौघेजण (३६) जखमी झाले आहेत. या घटनेने मानपाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ठाण्याच्या मानपाडा येथील हळदीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेले सहा मित्र ३० जानेवारी रोजी रात्री १२.३० वा. च्या सुमारास त्यांच्या कारने मानपाडा येथून कोलशेत येथे जाण्यासाठी निघाले होते. कारमध्ये मानपाडयाच्या शिवाजीनगर भागातील संजीव जैस्वाल यांच्यासह त्यांचा मित्र दीपक, जगदीश, अंकुश आणि अर्जून हे बसले होते. तर शैलेश पाटील हे कार चालवित होते. घोडबंदर रोडने कोलशेतच्या मार्गावर ही कार असतांना गुरुवारी पहाटे पावणे एक वा. च्या सुमारास मानपाडा ब्रिजच्या उतारावर पेट्रोल पंपासमोर भरघाव वेगात असलेल्या या कारचे चालक शैलेश यांचे अचानकपणे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारचे पुढील चाक दुभाजकावर आदळून कार डाव्या बाजूला कठडयावर जोरदार आदळली. त्यामुळे कारमधील अंकुश चांदवडे आणि अर्जून पारधी यांच्यासह सर्वजण गंभीर जखमी झाले. या दोघांनाही तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कार चालक शैलेश पाटील, दिपक कांबळे, जगदीश सलूजा उर्फ राजू आणि संजीव जेस्वाल हे चौघेजणही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळया खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चालक शैलेश याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले. या अपघातामध्ये कारचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक कापूरबावडी आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी याठिकाणी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने मदत कार्य केले.