बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी

By admin | Published: January 14, 2017 06:29 AM2017-01-14T06:29:15+5:302017-01-14T06:29:15+5:30

एकीकडे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असताना वाहनचालकांचा बेशिस्तपणाही वाहतुककोंडीला

Due to unguarded driving, | बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी

बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी

Next

डोंबिवली : एकीकडे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असताना वाहनचालकांचा बेशिस्तपणाही वाहतुककोंडीला कारणीभूत ठरत आहे. त्याचाच एक प्रत्यय शुक्रवारी पूर्वेकडील फडके मार्गावर आला. केडीएमटी आणि रिक्षाचालकाच्या बेशिस्तपणामुळे अन्य वाहनचालकांना कोंडीचा त्रास नाहकपणे सोसावा लागल्याची घटना दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. या घटनेत केडीएमटी चालकाच्या अरेरावीचा नमुनाही पहावयास मिळाला.
पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळील बाजीप्रभू चौक ते अप्पा दातार चौक हा रस्ता फडके रोड
म्हणून ओळखला जातो. या मार्गावरील मदन ठाकरे चौकापासून बाजीप्रभू चौकादरम्यान एक दिशा मार्ग आहे. त्यामुळे बाजीप्रभू चौकातून मदन ठाकरे चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी आहे. दरम्यान याठिकाणी झालेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांमुळे काढलेले सूचनांचे फलक पुन्हा लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांची बेशिस्त वाढत चालली आहे.
मदन ठाकरे चौकाकडे वाहनांना नो एंट्री असतानाही शुक्रवारी एका रिक्षाचालकाने त्या दिशेने वाहन नेले. तेवढ्यात समोरून आलेल्या केडीएमटीच्या निवासी विभागाच्या बसने त्याला जाण्यास जागा न देत त्याची कोंडी होईल, अशा प्रकारे बस थांबवली. यामुळे दोन्ही वाहने एकाच जागी थांबल्याने अन्य चालकांनाही याचा फटका बसला. अन्य वाहनचालकांनी केडीएमटीच्या चालकाला बस हळूहळू पुढे नेण्यास सांगितले. परंतु, बस बाजूला घेण्याऐवजी त्याने अन्य चालकांशी हुज्जत घातली. यावेळी काही पादचाऱ्यांनीही त्याला बस पुढे घेण्याची विनंती केली. मात्र त्याने हेकेखोरपणा सुरूच ठेवला होता. काही वेळाने बस मार्गस्थ झाली. परंतु, या कोंडीचा नाहक मनस्ताप वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागला.
दरम्यान, दुपारी १२ च्या सुमारास पश्चिमेलाही कोंडी झाली. स्टेशनजवळील डीएनएस बँकेसमोर काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने सुभाष रोडहून आलेली वाहने अडकली. गुप्ते रोडहून एव्हरेस्ट सोसायटीकडून जाणारी वाहनेही अडकली. (प्रतिनिधी)

Web Title: Due to unguarded driving,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.