कौशल्य मेडीकल फाऊंडेशनने केला अटी आणि शर्तींचा भंग, महासभेत भाजपाने केले गंभीर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 04:07 PM2018-09-27T16:07:31+5:302018-09-27T16:11:02+5:30
कौशल्य मेडीकल फाऊंडेशन बरोबर करण्यात आलेला करार चुकीचा असून त्यांच्याकडून नियम व अटींचा भंग झाल्याचा आरोप भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी गुरुवारी झालेल्या महासभेत केला. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करुन पुढील महासभेत अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांंनी प्रशासनाला दिले.
ठाणे - ठाणे महापालिकेने ९९ वर्षाच्या करारावर दिलेल्या कौशल्य मेडीकल फाऊंडेशनच्या (हॉस्पीटल) मुद्यावरुन गुरुवारी झालेल्या महासभेत बराच गोंधळ उडाला. संबधींतानी अटी आणि शर्तींचा भंग तर केला आहेच, शिवाय ओसी दिली असतांनाही बाजूलाच नवीन एनेक्स इमारत बांधण्याचे काम सुरु असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबधींतावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सुध्दा या प्रकरणाची गंभीर दखल घेत, या संदर्भातील अहवाल एका महिन्याच्या आत पुढील महासभेत सभागृहासमोर आणावा आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी असे स्पष्ट आदेश दिले.
गुरुवारी झालेल्या महासभेत पवार यांनी प्रश्नोत्तरांच्या तासाला कौशल्या मेडीकल फाऊंडेशनला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या हॉस्पीटलचा मुद्दा चांगलाच लावून धरला. या संस्थेबरोबर किती वर्षांचा करार करण्यात आला होता, बाजारभावानुसार भाडे वसुल केले जाते का? असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यानुसार संबधींत संस्थेबरोबर ९९ वर्षांचा करार करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली. तर दर ३० वर्षांसंदर्भातील भाडेवाढी संदर्भातील करारही करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु एका संस्थेला एक न्याय आणि दुसऱ्या संस्थांना ३० वर्षांच्या कराराचा न्याय ही कोणती पध्दत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच पालिकेने ज्या काही अटी शर्ती घालून दिल्या होत्या, त्याचे उल्लंघनसुध्दा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर बाजारभावानुसार भाडे वसुल होते किंवा नाही, याबाबतही योग्य उत्तर प्रशासनाला देता आले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या इमारतीच्या बाजूला सध्या एनेक्स इमारतीचे काम सुरु असून त्याला परवानगी घेण्यात आली आहे का? असा सवाल उपस्थित केला. तर याच मुद्याला हात घालत पवार यांनी या संपूर्ण इमारतीला ओसी देण्यात आली होती, तर आता नवी इमारती कशी काय उभी राहत आहे, असा सवाल उपस्थित करुन प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन त्याचा लेखी अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले.