चविष्ट रानभाज्यांमुळे वाढला पंगतीचा गोडवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 12:56 AM2019-06-07T00:56:14+5:302019-06-07T00:56:31+5:30
हिरव्या देवाची यात्रा उत्साहात : आदिवासींच्या समृद्धीचे घडले दर्शन
ठाणे/ मुरबाड : जंगलाचा खऱ्या अर्थाने राजा असलेल्या आदिवासींसमवेत पर्यावरणप्रेमी, अभ्यासक आणि पुणे-मुंबईतून आलेल्या नागरिकांनी बुधवारी मुरबाड तालुक्यातील शिसेवाडीत हिरवादेव अर्थात निसर्गाचा जागर केला. यावेळी स्थानिक आदिवासी मुली-महिलांनी कच्च्या तसेच पाककृती करून आणलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन प्रमुख आकर्षण ठरले. निसर्गरांगोळी स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, पारंपरिक नाच स्पर्धा, पर्यावरणावर आधारित चालताबोलता प्रश्नमंजूषा स्पर्धेतही आबालवृद्धांनी सहभागी होत आपल्यातील समृद्धीचे दर्शन घडवले. त्यानंतर, भोजनाच्या पंगतीत वाढलेल्या रानभाज्यांचा पाहुण्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला.
आदिवासींचे निसर्गाशी असलेले नाते अधिक घट्ट करून नवीन पिढीला आपल्या निसर्गाप्रति जबाबदारीची जाणीव करून देणे, निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करणे, यासाठी पाच वर्षांपासून पर्यावरणदिनी अॅड. इंदवी तुळपुळे यांची श्रमिक मुक्ती संघटना, वननिकेतन, अश्वमेध प्रतिष्ठान, मंडलिक ट्रस्ट तसेच आदिवासी-जंगलवासी वनहक्कधारक यांच्यातर्फे मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये हिरव्या देवाची यात्रा साजरी केली जाते. मात्र, यंदा प्रथमच नाणेघाटाच्या पायथ्याशी शिसेवाडी येथील राज्य सरकारच्या वनविभागाने सुरू केलेल्या भूमाता वनधन विक्री केंद्राला प्रोत्साहन देण्यासाठी ही यात्रा तेथे भरवण्यात आली.
पावसाळा तोंडावर असतानाही शेतीवाडीची कामे बाजूला सारून परिसरातील गावपाड्यांतील आदिवासी सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी दाखल झाले. आदिवासी मुली-महिलांची रानभाज्या मांडण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. सिंगापूर, मढवाडी, शिरवाडी, शिसेवाडी, भागवाडी, भेरेवाडी, दिवाणपाडा आदी अशा नऊ गटांनी रानभाज्या स्पर्धेत सहभागी होताना ५७ प्रकारच्या भाज्या मांडल्या होत्या. त्यात यंदा सहा भाज्यांची नव्याने भर पडली. पाने, फुले, फळे, मुळे आणि कंद अशा प्रत्येक वर्गवारीतील रानभाज्या येथे होत्या.काही गटांनी वाळवून, सुकवलेल्या भाज्यांचा इतरवेळीही कसा वापर करता येईल, हे पटवून दिले. चटणी, कढी, भाज्यांची पाककृती व त्यांचे वैशिष्ट्य, औषधी गुणधर्म अशी सखोल माहिती त्यांनी उपस्थितांना उत्साहाने दिली.
दरम्यान, या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून अंनिसच्या मुक्ता दाभोलकर उपस्थित होत्या. जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भोसले, तहसीलदार अमोल कदम, जि.प. सदस्या नंदा उघडा, उपवनसंरक्षक तुळशीराम हिरवे आदींनीही भेट दिली.
पावसाला अद्याप सुरुवात न झाल्याने यंदा रानभाज्या असतील का, असा प्रश्न पडला होता. परंतु, ५७ प्रकारच्या भाज्या स्पर्धेत मांडण्यात आल्या. सेंद्रिय, पौष्टिक भाज्या मुरबाडमधील जंगलात उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील जंगल वाचवतानाच वनपट्ट्यांतील उत्पादने वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे. - सुरेखा दळवी, परीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या
आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी लढा देण्याबरोबरच येथील वनसंपदा जपण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील रानभाज्या, वनौषधी यांचे महत्त्व शहरी नागरिकांना कळावे तसेच स्थानिकांना त्याद्वारे प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हिरव्या देवाची यात्रा भरवली जात आहे. - अॅड. इंदवी तुळपुळे, सल्लागार, श्रमिक मुक्ती संघटना