बदलापूरच्या आगीवेळी बसला पाणी कपातीचा फटका; बंब झाले रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:06 PM2019-01-04T18:06:08+5:302019-01-04T18:06:48+5:30
बदलापुरातील कंपनीला आग लागल्यावर सर्वात आधी बदलापूरची अग्निशमन गाडी घटनास्थळी गेली. मात्र, आग भडकलेली असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अखंडीत पुरवठा गरजेचे होता.
- पंकज पाटील
बदलापूर : बदलापुरातील मानकिवली गावाला लागुन असलेल्या एमआयडीसी भागात छपाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या प्लॅटीनम पॉलीमोर या कंपनीला भीषण आग लागली. कंपनीपासून काही अंतरावरच कुळगांव-बदलापूर पालिकेचे अग्नीशमन केंद्र आहे. घटनास्थळी पालिकेचे बंब वेळेत देखील पोहचले. मात्र, पालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाण्याची कमतरता भासल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. भरलेल्या बंबातून जेवढे नियंत्रण मिळविणे शक्य झाले तेवढेच काम सुरुवातीला झाले. मात्र, अग्निशमन बंबाला पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारे टँकर भरले गेलेच नाहीत. शुक्रवारी एमआयडीसी भागात पाणी कपात असल्याने त्या परिसरातील पाणी पुरवठा हा पूर्ण बंद ठेवण्यात येत असल्याने पाणी कपातीचा फटका या कंपनीला सर्वाधिक बसला.
बदलापुरातील कंपनीला आग लागल्यावर सर्वात आधी बदलापूरची अग्निशमन गाडी घटनास्थळी गेली. मात्र, आग भडकलेली असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अखंडीत पुरवठा गरजेचे होता. मात्र, पाणी कपातीमुळे गुरवारी रात्रीपासुनच पाणी पुरवठा बंद राहत असल्याने शुक्रवारी आग लागल्यावर ती आटोक्यात आणण्यासाठी पाणी कमी पडले. अग्नीशमन बंबाला टँकरने पाणी पुरवठा गरजेचे होते. मात्र, एमआयडीसी भागात पाणी बंद असल्याने टँकरला इतर ठिकाणाहुन पाणी भरुन आणावे लागत होते. अनेकवेळा पाण्याअभावी अग्नीशमन विभागाचे कर्मचारी हे केवळ पाण्याची वाट बघत बसले होते. आग मोठी असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन बंबासोबत टँकरचीही गरज होती. वेळेवर टँकर आले देखील मात्र हे टँकर भरण्यासाठी जागा नसल्याने घोळ झाला. सुदैवाने जीवन प्राधिकरणाचा पाणी पुरवठा सुरू असल्याने काही प्रमाणात पाण्याची कमतरता कमी झाली. मात्र, पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध न झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड जात होते.
पाण्यासोबतच बघ्यांचाही त्रास मोठय़ा प्रमाणात झाला. आग पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक एकत्रित आले होते. ही गर्दी आवरण्यातच प्रशासनाचा सर्वाधिक वेळ जात होता. पोलीस प्रशासनालाही गर्दीवरच लक्ष केंद्रीत करुन बसावे लागले. आग लागल्यावर काही स्फोट कंपनीत झाल्याने घातक रसायन असल्याची जाणिव अग्नीशमन विभागाला झाल्याने मोठी हानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी हे देखील सतर्क राहुन काम करत होते.
आजच्या आगीच्या घटनेमुळे आपत्कालीन स्थितीत पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने अग्नीशमन यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे. पाणी कपातीचे धोरण हे शासन स्तरावरील असले तरी आपत्कालीन स्थितीत पाण्याचा पर्यायी व्यवस्था नसल्याचे आजच्या आगीच्या घटनेवरुन स्पष्ट दिसत आहे.