हलगर्जीपणामुळे वज्रेश्वरी मंदिरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:35 AM2019-05-20T00:35:13+5:302019-05-20T00:35:22+5:30
आज कुठल्याही शहरातील जीवन सुरक्षित राहिलेले नाही. लहानमोठे गुन्हे घडत आहेत. पोलीस आपल्या परीने या गुन्ह्यांना आळा घालण्याचे काम करत आहेत. पण, सामान्यांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, हेही तितकेच खरे. दिवसाढवळ्या घरफोड्या होत आहेत. पण, चोरांनी थेट वज्रेश्वरी मंदिरात चोरी केली. यामुळे देवही आता सुरक्षित राहिले नाही, हे खरे. याच चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’चे प्रतिनिधी पंकज रोडेकर, पंकज पाटील, सचिन सागरे, धीरज परब, सदानंद नाईक, दीपक देशमुख यांनी जिल्ह्याच्या विविध शहरांतील मंदिरांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
संपूर्ण महाराष्ट्रात औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध असलेल्या अकलोली येथील गरम पाण्याच्या कुंडामुळे आणि प्राचीन काळात उल्लेख असलेली वज्रेश्वरी, कालिका आणि रेणुकामातेचे मंदिर, भगवान नित्यानंद स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले गणेशपुरी. या सर्व ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या परिसरात वज्रेश्वरीदेवी मंदिर, अकलोली येथे शंकर महादेव मंदिर, गुजराती समाजाचे जलाराम मंदिर आणि नदीच्या पलीकडे प्रतिशिर्डी मंदिर तसेच गणेशपुरी येथे नित्यानंद समाधी मंदिर, गुरुदेव सिद्धपीठ आश्रम ,भद्रकालीमाता मंदिर आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी यातील वज्रेश्वरीदेवीच्या मंदिरात शुक्रवारी पडलेल्या दरोड्यामुळे मंदिर, देवही सुरक्षित नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वज्रेश्वरीदेवी ही आगरी-कोळी आणि भंडारी या समाजांची कुलदेवता असल्याने लाखो भाविक या देवीच्या दर्शनासाठी वर्षभर येत असतात. चार विश्वस्त आणि एक परंपरागत विश्वस्त यांच्यामार्फत या देवस्थानचा कारभार चालतो. या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आणि देवीचा नवस फेडण्यासाठी येऊन देवीला यथाशक्ती सोनेचांदीचे दागिने अर्पण करतात किंवा दानपेटीत रोख रक्कम टाकतात. संस्थानच्या मालकीचे देवीचे पारंपरिक आणि मोठ्या भक्तांनी दिलेले आणि देवीला अर्पण केलेले दागिने हे संस्थानच्या कार्यालयात तिजोरीत ठेवण्यात येतात. तर, भक्तांनी दानपेटीत दान केलेली रक्कम ही महिन्यातून एकदा काढली जाते. परंतु, तोपर्यंत या दानपेट्या आणि देवीचे दागिने यांच्या सुरक्षेसाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाने एकूण चार सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. यात दोन मंदिरे प्रशासनाचे कायमस्वरूपी तर दोन खाजगी सुरक्षारक्षक आहेत. परंतु, धक्कादायक बाब अशी की, यांच्या कामाची वेळ ही शिफ्टस्वरूपाची असल्याने रात्रीच्यावेळी फक्त एकाच सुरक्षारक्षकावर आणि सीसीटीव्हीवर एवढ्या मोठ्या मंदिराची सुरक्षा अवलंबून असते. या ठिकाणी देवीचे मंदिर आणि इतरही चार मंदिरे आहेत. या मंदिरात रात्री दरतासाला टोल देण्याची प्रथा आहे, तर जो सुरक्षारक्षक सुरक्षेसाठी रात्री तैनात असतो, तोच मंदिराच्या खाली असलेल्या कार्यालयाजवळ येऊन टोल देत असतो. त्यावेळी मंदिर परिसरात कोणीही प्रवेश करू शकतो, याच कारणामुळे आणि फक्त एकच सुरक्षारक्षक असल्याने याआधी तीन वेळा या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिर,
मारुती मंदिर आणि गोधडे महाराज समाधी या ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. या सर्व प्रकाराला मंदिर प्रशासन आणि विश्वस्त मंडळाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. याच हलगर्जीपणामुळे पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने मंदिरातील एकमेव असलेल्या सुरक्षारक्षकाला बांधून ठेवून मंदिराच्या मुख्य गाभाºयातील दानपेट्या फोडून सुमारे १० ते १२ लाख रुपये लंपास केले. या प्रकरणामुळे वज्रेश्वरीदेवी संस्थानचा सुरक्षेच्या दृष्टीने असलेला ढिसाळपणा आणि विश्वस्तांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. विशेष म्हणजे याआधीही तीन वेळा चोरी होऊनही विश्वस्तांनी कोणताही धडा त्यातून घेतला नाही. दरम्यान, याआधी या ठिकाणी आठ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. परंतु, ते कोणत्या कारणास्तव कमी करण्यात आले, हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. वज्रेश्वरीदेवी मंदिराजवळच असलेल्या तीर्थक्षेत्र गणेशपुरी येथे भगवान नित्यानंद स्वामींचे समाधी मंदिर आहे. या ठिकाणी संपूर्ण भारतातून आणि परदेशांतूनही लाखो भाविक नित्यानंद स्वामींच्या दर्शनासाठी तसेच गुरु देव सिद्धपीठ येथे ध्यानधारणेसाठी येतात.
नित्यानंद स्वामींच्या मंदिरात १८ सुरक्षारक्षक
भगवान नित्यानंद स्वामींच्या समाधी मंदिराचा कारभार श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद महाराज संस्थानमार्फत चालवला जातो. या ठिकाणी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात रुपये आणि परकीय चलन, सोनेचांदीच्या वस्तू अर्पण करत असतात. यामुळे येथे सुरक्षेसाठी जवळपास १८ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून जागोजागी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी समाधी मंदिर परिसरात चार सुरक्षारक्षक सतर्क असतात, तर नित्यानंद महाराज निवासस्थान, भद्रकालीदेवी मंदिर याही ठिकाणी एकेक सुरक्षारक्षक असतात. यामुळे याठिकाणी आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार किंवा चोरी झालेली नाही.
गुरुदेव सिद्धपीठ येथे ग्रामीण पोलिसांचा पहारा
गुरु देव सिद्धपीठ येथे आश्रमाची खाजगी सुरक्षाव्यवस्था आहे आणि ठाणे ग्रामीण पोलिसांकडून कायमस्वरूपी २४ तास पोलिसांची सुरक्षा याठिकाणी आहे.
अकलोली या गरम पाण्याच्या कुंडाच्या ठिकाणी गुजराती समाजाचे मोठे जलाराम मंदिर आहे. याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी वास्तव्यही करतात.
त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण मंदिराला दगडी संरक्षक भिंत उभी केली असून कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. याठिकाणी असलेल्या पुरातन शंकर महादेव मंदिराला जास्त उत्पन्न नसल्याने इथे सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले नाही.
येथील नदीच्या पलीकडे असलेल्या प्रतिशिर्डी म्हणून बनवण्यात आलेल्या साईबाबा मंदिरालाही हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. येथील ईश्वरधाम ट्रस्टने योग्य ती सुरक्षाव्यवस्था याठिकाणी ठेवलेली आहे.
जानकादेवी मंदिरात आठ कॅमेरे
माजिवडा, वर्तकनगर परिसराची ग्रामदेवता असलेली जानकादेवी हे मंदिर जवळपास ३५० ते ४०० वर्षे प्राचीन आहे. शहराच्या एका बाजूला असलेल्या मंदिरात नवरात्रीमध्ये मोठा उत्सव साजरा होत असतो. हा उत्सव नवरात्र सुरू होण्याच्या आठवड्यापूर्वी आणि दसºयानंतर चार ते पाच दिवस सुरू असतो. या दिवसांत जवळपास सात लाख भाविक येतात. याच कालावधीत साधारणत: दानपेटीत अडीच ते तीन लाख दानस्वरूपात तसेच नारळाच्या रूपाने एक लाख असे उत्पन्न मिळते. मे महिन्यात वर्धापनदिनीही मोठी गर्दी असते. त्याचबरोबर दरमंगळवारी आणि शुक्रवारी दोनेकशे भाविक मंदिराला भेट देतात. सुरक्षेचा विचार केल्यास मंदिर आणि आवारात आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून तीन पाळ्यांत येथे सुरक्षारक्षक तैनात असल्याची माहिती जानकादेवी उत्कर्ष मंडळाचे सचिव अनंत टेमकर यांनी दिली.
अय्यपा मंदिरालाही कवच
केरळमधील मंदिरात होणारी पूजा ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील असलेल्या अय्यपा मंदिरात होते. त्यामुळे केरळवासीयांचे महाराष्टÑातील एक तीर्थक्षेत्र म्हणून हे ओळखले जात असून हे मंदिर साधारणपणे ३० वर्षे जुने आहे. मंदिराच्या वर्धापनदिनी ४० ते ५० हजार भाविक हजेरी लावतात. दरशनिवारी अंदाजे पाच हजार भाविक येतात. वर्धापनदिनी साजºया होणाºया उत्सवात दानपेटीत अंदाजे दीड ते अडीच लाखांच्या आसपास उत्पन्न मिळते. तसेच मंदिर गाभाºयासह मंदिर आवारात एकूण १५ सीसीटीव्ही आणि चार सुरक्षारक्षक मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असल्याची माहिती माजी सचिव के. बालन यांनी दिली.