१५०० कामगारांचे ‘डुप्लिकेट क्लेम’, एनआरसी कामगारांची देणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:46 AM2019-05-10T01:46:28+5:302019-05-10T01:47:04+5:30
२००९ पासून बंद असलेल्या आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने ९८४ कोटी ८३ लाख रुपयांचा क्लेम दाखल केला आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - २००९ पासून बंद असलेल्या आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने ९८४ कोटी ८३ लाख रुपयांचा क्लेम दाखल केला आहे; मात्र या क्लेममध्ये मृत आणि निवृत्त झालेल्या कामगारांचा हिशोब धरला गेला नसल्याने, आॅल इंडिया इंडस्ट्रियल अॅण्ड जनरल वर्कर्स युनियन या कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या थकबाकीपोटी १३०० कोटी रुपयांचा हिशोब मिळावा, अशी मागणी करीत २ हजार ७०० कामगारांचा क्लेम लवादाकडे दाखल केला आहे. कामगारांच्या क्लेम अर्जात १५०० पेक्षा जास्त कामगारांचे क्लेम हे डुप्लिकेट दिसून येत आहेत. अनेकांची नावे दोन वेळा टाकली आहेत. त्यामुळे लवाद कोणता क्लेम ग्राह्य धरणार, याकडे कामगारांचे लक्ष आहे.
आॅल इंडिया इंडस्ट्रियल अॅण्ड जनरल वर्कर्स युनियन संघटनेचे कामगार नेते उदय चौधरी यांनी सांगितले की, कंपनी व्यवस्थापनाने दाखल केलेला ९८४ कोटी ८३ लाख रुपयांच्या थकीत देण्याचा क्लेम हा ४ हजार ४१ कामगारांचा आहे. त्यात कामगारांच्या थकीत रकमेचा क्लेम हा सरसकट दाखल करण्यात आलेला आहे. त्यात मृत तथा सेवानिवृत्त कामगारांचा उल्लेख नाही.
कंपनी व्यवस्थापनाने दाखल केलेले क्लेम चौधरी यांच्या संघटनेस मान्य नाहीत. अनेक कामगारांचा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युटीची रक्कम थकीत देण्यात धरलेली नव्हती. ती चौधरी यांच्या संघटनेने थकीत देण्यात धरली आहे. ज्या कामगारांची सेवा २० वर्षे बाकी होती, त्यांना कंपनी बंद झाल्याने किमान १० वर्षांचा हिशोब तरी दिला जावा, अशा कामगारांचाही दावा या संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. तसेच थकीत देणी असलेल्या रकमेवर १८ टक्के व्याज दिले जावे, अशी मागणी केली आहे. कंपनीने पंजाब नॅशनल बँकेकडून नव्या प्रकल्पासाठी कर्ज घेतले होते. या बँकेने न्यायालयाकडून कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे. थकीत देण्याच्या वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी इंटेरियम रिसोल्यूशन प्रोफेशनल म्हणून विकास गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. गुप्ता यांच्या मार्फत कामगारांच्या थकीत देण्याचा क्लेम भरला गेला आहे. गुप्ता यांच्या माध्यमातून न्यायालयास अहवाल सादर केला जाणार आहे. २२ मार्च २०१८ रोजी हे क्लेम कंपनीने भरुन दिले आहेत.
चौधरी यांच्या कामगार संघटनेने २२ मार्चपर्यंत २ हजार ७०० कामगारांचे क्लेम दाखल केले होते. त्याचा हिशोब जवळपास १३०० कोटी रुपये आहे. कंपनी व्यवस्थापनासह संघटनेच्या वतीने कामगारांच्या थकीत देण्याचे क्लेम गुप्ता यांना प्राप्त झाल्यावर गुप्ता यांनी चौधरी यांना एका पत्राद्वारे कळविले की, कामगारांच्या क्लेम अर्जात १५०० पेक्षा जास्त कामगारांचे क्लेम डुप्लिकेट आहेत. त्यामुळे चौधरी यांच्या कामगार संघटनेने जवळपास १ हजार ५०० पेक्षा जास्त क्लेमचे अर्ज पुन्हा भरून दिले. त्यात अन्य कोणत्याही कामगार संघटनेच्या वतीने क्लेम केला नसल्याचे हमीपत्रही त्यासोबत जोडले आहे.
क्लेम डुप्लिकेट असतील, तर प्रकिया स्थगित करावी - चौधरी
इंटेरियम रिसोल्यूशन प्रोफेशनलने सांगितल्यानुसार प्रक्रिया केली आहे. कामगारांचे क्लेम डुप्लिकेट असतील तर ही प्रक्रिया थांबविली जावी. संघटनेला विश्वासात न घेता केली जाणारी प्रक्रिया स्थगित करावी, असे वर्कर्स युनियन संघटनेचे कामगार नेते उदय चौधरी यांचे म्हणणे आहे.
चौधरी यांच्या संघटनेच्या वतीने थकीत देण्यावर साधा व्याज दर ग्राह्य धरला आहे. अन्य संघटनेने चक्रीवाढ व्याजाने देणी देण्यात यावी असे म्हटले आहे. कामगारांची थकीत देणी ४ ते १२ टक्के व्याजाने देण्यास काही हरकत नसल्याचे न्यायालयाने काही प्रकरणांमध्ये स्पष्ट केले आहे.
कंपनी थकीत देण्यासंदर्भातील अधिकार उच्च न्यायालयाकडे होते. ते आता नॅशनल कंपनी लॉ ट्रब्युनलला आहेत. कामगारांच्या थकीत देण्याचा विषय याच लवादाकडे आहे. पुढील प्रक्रिया या लवादाने पार पाडणे अपेक्षित असल्याचे उदय चौधरी यांनी सांगितले.