जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी कॉंक्रिटचा राज्य महामार्ग खोदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:43 AM2021-09-27T04:43:44+5:302021-09-27T04:43:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एमएमआरडीएच्या नियोजनशून्य कारभाराचा मोठा फटका कल्याण - कर्जत राज्य महामार्ग या प्रमुख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एमएमआरडीएच्या नियोजनशून्य कारभाराचा मोठा फटका कल्याण - कर्जत राज्य महामार्ग या प्रमुख रस्त्याला बसला आहे. कारण हा रस्ता तयार करताना रस्त्याखाली येणाऱ्या जलवाहिन्या स्थलांतरित न केल्याने आता जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तब्बल ५५ कोटींचा रस्ता तोडण्याची वेळ आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी बनवलेला काँक्रिटचा रस्ता खोदण्याची वेळ आल्याने एमएमआरडीएच्या नियोजनशून्य कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्ग या प्रमुख रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी या रस्त्याच्या बाजूने गेली होती. मात्र, रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना रुंदीकरण सुद्धा करण्यात आल्याने ही जलवाहिनी रस्त्याच्या जागेत आली. त्यामुळे रस्ता बांधताना ती बाजूला स्थलांतरित करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता एमएमआरडीएने थेट जलवाहिनीवरच सिमेंटचा रस्ता तयार केला. त्यावेळी भविष्यात जलवाहिनीची दुरुस्ती करायची झाल्यास रस्ता तोडावा लागेल, अशी भीती व्यक्त झाली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत जलवाहिनी अक्षरशः रस्त्याखाली गाडून टाकली. त्यावेळी केलेले दुर्लक्ष हे आता मात्र महागात पडत आहे. कारण ही जलवाहिनी खराब झाली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी तब्बल ५५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रिटचा रस्ता तोडण्याची वेळ आली आहे.
अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या समोर हा रस्ता खोदण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याचा जो पॅच आता खोदला आहे, तो अवघ्या ६ महिन्यांपूर्वीच बांधण्यात आला होता. मात्र, त्या रस्त्याखालच्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह बिघडल्याने तो दुरुस्त करण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला. जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी रस्ते खोदण्यात आल्यास भविष्यात हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार आहे.
---------------