ऑटो रिक्षात प्रवाशांची लुटमार करणाऱ्या दुक्कलीला कोनगाव पोलिसांनी केली अटक
By नितीन पंडित | Published: December 1, 2023 07:15 PM2023-12-01T19:15:14+5:302023-12-01T19:15:29+5:30
आरोपींकडे अधिक तपासात अजून काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी यावेळी दिली आहे.
भिवंडी: शहर व परिसरात रिक्षा प्रवासी म्हणून बसून सहप्रवाशांना रस्त्यात अडवून लुटमार करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात कोनगाव पोलिसांनी यश मिळवले असून त्यांच्या ताब्यातून चोरीची एक कार दोन रिक्षा व सात मोबाईल असा ७ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत पाच गुन्ह्यांची उकल केली असल्याची माहिती भिवंडी पूर्व विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी शुक्रवारी कोनगाव पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
२६ नोव्हेंबर रोजी मानकोली ते रांजनोली या दरम्यान रिक्षाने प्रवास करणारे सिंटू मौर्य यास रिक्षा चालकासह त्याच्या दोघा साथीदारांनी रस्त्यात रिक्षा थांबवून चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लुटमार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार व पोलिस निरीक्षक दीप बने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे, पोलीस हवालदार मधुकर घोडसरे, जगदिश पाटील,पोलीस नाईक नरेंद्र पाटिल,पोलीस शिपाई राहुल वाकसे, हेमराज पाटिल,कुशल जाधव,हेमंत खडसरे,अच्युत गायकवाड,रमाकांत साळुंखे या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीने पोलिसांनी कल्याण येथून शेखर गोवर्धन पवार,वय २६ वर्ष, रा.नेतीवली चक्की नाका, कल्याण पुर्व व मनीष भोलानाथ गुप्ता,वय २७ वर्ष,रा.उल्हासनगर नं ४ यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अशा प्रकारे लुटमारीच्या या व्यतिरिक्त भिवंडी तालुका,रायगड येथील दादर सागरी पोलीस ठाणे,वाशिंद ता.शहापूर व रबाळे पोलिस ठाणे या पोलिस ठाण्यात अशाच प्रकारे लुटमार करून कार व रिक्षा सुध्दा चोरी केली असून या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.या आरोपींचा एक साथीदार फरार असून त्याचा शोध पोलिस घेत असून पकडलेल्या दोघा आरोपींकडे अधिक तपासात अजून काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी यावेळी दिली आहे.