अपंगांच्या स्टॉलवर पालिकेची गदा
By admin | Published: January 25, 2016 01:18 AM2016-01-25T01:18:47+5:302016-01-25T01:18:47+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिका एकीकडे अपंगांसाठी कल्याणकारी योजना राबवत असताना दुसरीकडे पालिकेनेच पाच परवानाधारक अपंगांच्या रोजीरोटीवर
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका एकीकडे अपंगांसाठी कल्याणकारी योजना राबवत असताना दुसरीकडे पालिकेनेच पाच परवानाधारक अपंगांच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा प्रयत्न चालवल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. वसई पश्चिमेतील अभिलाषा रोडवर असलेल्या २२ स्टॉलवर पालिकेने कारवाई केली. विशेष म्हणजे या २२ स्टॉलमध्ये पाच अपंगांचे स्टॉल असून या स्टॉलना तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने परवानगी दिलेली आहे.
अपंगांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी २००८ मध्ये तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने पाच अपंगांना वसई पश्चिमेतील साईनगर स्थित अभिलाषा रोडच्या बाजूला स्टॉलची परवानगी दिली होती. तर, अन्य १७ स्टॉलधारकांनीही परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केले होते. या ठिकाणी एकूण २२ स्टॉलच्या माध्यमातून अपंग व आर्थिक दुर्बल घटकांतील लोक किरकोळ सामानविक्री करून आपला उदरनिर्वाह करायचे. परंतु, एक महिन्यापूर्वी पालिकेच्या ‘एच’ प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुरेश पवार यांनी स्टॉलमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची सबब पुढे करून सर्व स्टॉलधारकांना स्टॉल हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर, परवानाधारक स्टॉलधारकांनी मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना वसई-नालासोपारा लिंक रोड किंवा १०० फुटी रोडवर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, या आश्वासनांची पूर्तता न करताच पालिकेने स्टॉल हटवण्याची कारवाई सुरू केल्याने स्टॉलधारकांनी त्यास तीव्र विरोध केला. (प्रतिनिधी)
पालिका पर्यायी जागा उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत स्टॉल हटवणार नाही, अशी भूमिका अपंग स्टॉलधारक देवराज कपूर, ब्रिजेशकुमार चौबे, चंपकभाई शहा, रोहित रामदास आसर, बलजितसिंग गुलाटी व बाबुलाल चव्हाण यांनी घेतली आहे. अन्य स्टॉलधारकही मागील सात ते आठ वर्षांपासून पालिकेची दैनंदिन पावती फाडत असल्याचे सांगून पालिकेने आमचा रोजगार हिरावून घेतल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ ओढवणार असल्याचे सांगितले.
या स्टॉलवर अनेकांची कुटुंबे अवलंबून आहेत, त्यामुळे पालिकेने या गरिबांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, असे काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य महिला जनरल सेक्रेटरी सय्यद नजमा अस्लम व सय्यद मोहम्मद अस्लम यांनी सांगितले.
वसईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध फेरीवाले बस्तान मांडून बसले आहेत. मुख्य रस्त्यांवर धनाढ्य गाड्या विक्रेत्यांकडून गाड्या उभ्या ठेवण्यासाठी रस्त्याचा वापर केला जातो. असे असतानाही पालिका त्याकडे काणाडोळा करून गरिबांच्या रोजीरोटीवर गदा आणत असल्याचा आरोप अस्लम यांनी केला आहे.