शीळ येथे डम्पिंगला तत्त्वत: मान्यता
By admin | Published: July 25, 2015 04:09 AM2015-07-25T04:09:11+5:302015-07-25T04:09:11+5:30
ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या ओला, सुका कचरा मोहिमेत अखेर ठाण्यातील १०० हून अधिक सोसायट्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार
ठाणे : ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या ओला, सुका कचरा मोहिमेत अखेर ठाण्यातील १०० हून अधिक सोसायट्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, आता या सोसायट्यांकडून कचऱ्याचे वर्गीकरण करूनच पालिका आता कचरा गोळा करीत आहे. सध्या पालिका या सोसायट्यांच्या माध्यमातून ५० टन कचरा गोळा करीत असून तो सीपी तलाव येथे टाकत आहे. परंतु, आता पर्यावरण विभागाने शीळच्या जागेला तत्त्वत: मंजुरी दिली असून पुढील महिन्यापासून या भागात खतनिर्मिती प्रकल्प राबविला जाणार आहे.
शहरात आजघडीला ६५० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. तो दिव्यातील एका खाजगी जागेवर टाकला जात आहे. शिवाय, पालिकेने तळोजा येथील सामायिक भरावभूमीत सहभागी होण्यासाठी पावले उचलली आहेत. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियम हाताळणी व व्यवस्थापन २००० नुसार घनकचरा निर्माण करणाऱ्या प्रत्येक घटकाने ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, एप्रिल महिन्यात पालिकेने सोसायट्यांपर्यंत जाऊन जनजागृती सुरू करून प्रत्येक सोसायटीला नोटीस बजावली होती. त्याद्वारे जे ओला, सुका कचरा वेगळा करणार नाहीत, त्यांचा कचराच उचलला जाणार नसल्याचा इशारा पालिकेच्या घनकचरा विभागाने दिला होता. त्यानुसार, काही सोसायट्यांचा कचराही उचलणे पालिकेने बंद केले होते.
अखेर, या सोसायट्यांनीदेखील यात सहभाग घेऊन आता ही मोहीम यशस्वी करण्यासाठी १०० सोसायट्यांनी साथ दिली आहे. दरम्यान, तीन सोसायट्यांनी यापूर्वीच ओला, सुका कचरा वेगळा करून आपल्याच सोसायटी आवारात या कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. त्यानुसार, इतर सोसायटीधारकांनी अशा प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावली तर त्यांना मालमत्ता करात पाच टक्के सूट दिली जाईल, असे पालिकेच्या घनकचरा विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)