डम्पिंगप्रश्नी रहिवासी आक्रमक, महासभेत देणार धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:07 AM2018-12-07T01:07:46+5:302018-12-07T01:07:48+5:30
आधारवाडी डम्पिंग ग्राउंड हटवण्यासंदर्भात अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसताना त्याला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे.
कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंड हटवण्यासंदर्भात अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसताना त्याला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. शहरात नुकत्याच झालेल्या आगरी-कोळी महोत्सवाच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांच्यापासूनही हा ज्वलंत विषय लपवून ठेवण्यात आला. मुख्यमंत्री महोत्सवाला उपस्थित असताना दुसरीकडे डम्पिंगला आग लागली होती. ही वस्तुस्थिती असताना लोकप्रतिनिधींनी याला बगल दिल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. त्यामुळे केडीएमसीच्या महासभेत धडक देत लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
डम्पिंग हटवण्यासंदर्भात पावसाळ्यात रहिवाशांनी विशेष मोहीम हाती घेतली. दरम्यानच्या कालावधीत डम्पिंगचा धूर, उग्र वास कमी झाला. केडीएमसीकडून डम्पिंग हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या मोहिमेला अर्धविराम देण्यात आला होता. पण, कालांतराने केडीएमसीची कृती थंड पडली. त्यात आगीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे पुन्हा डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुख्यमंत्री नुकतेच कल्याण दौऱ्यावर आले होते. शहरातील फडके मैदानावरील आगरी-कोळी महोत्सवालाही त्यांनी भेट दिली होती. परंतु, ते जेव्हा कल्याणमध्ये आले, तेव्हाही डम्पिंगला आग लागलेली होती. मात्र, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत ही गोष्ट जाऊच नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी आटोकाट प्रयत्न केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. डम्पिंगचे दिवे बंद केले आणि तत्काळ फवारणी करून आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र, मुख्यमंत्री गेल्यानंतर आगीचे सत्र सुरूच राहिले असून धुराने श्वास घुसमटणे नित्याचीच बाब झाल्याकडे स्थानिक रहिवाशांनी लक्ष वेधले आहे.
फडणवीस यांनी मोहने येथील कार्यक्रमात तेथील बंद असलेल्या एनआरसी कंपनी तसेच रिंगरूट प्रकल्पाबाबत भाष्य केले. त्यामुळे वाहतूककोंडी तसेच वर्षानुवर्षे त्रासदायक होणाºया डम्पिंगच्या प्रश्नाबाबत काहीतरी बोलतील आणि आम्हाला काहीतरी दिलासा मिळेल, अशी आशा रहिवाशांना होती. परंतु, त्यांची घोर निराशा झाली. डम्पिंगचा गंभीर विषय फडणवीस यांच्याकडे न काढणाºया लोकप्रतिनिधींबाबत कमालीचा रोष निर्माण झाला आहे. याबाबत त्यांना जाब विचारण्याचा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे. गुरुवारी फडके मैदान परिसरात रहिवासी सीमा दिवाथे, स्मिता जोशी व यशश्री जहागीरदार यांच्या पुढाकाराने विशेष बैठक झाली. यामध्ये प्रारंभी फडणवीस यांनी केलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
।तेरी भी चूप मेरी भी चूप, स्थानिकांना कोणीच वाली नाही
ज्या महोत्सवाला मुख्यमंत्री उपस्थित होते, त्याला सर्वच पक्षांचे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी उपस्थित होते. मात्र, एकालाही या ज्वलंत प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधावे, असे वाटले नाही. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी परिस्थिती असून स्थानिकांना कोणीच वाली उरला नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी लोकप्रतिनिधींना जाब विचारायचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला परिसरातील इमारतींमधील रहिवासी, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर, महेश बनकर हे देखील आवर्जून उपस्थित होते.