डम्पिंगवरील कचरा सपाटीकरण कंत्राट वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:20 AM2018-10-15T00:20:46+5:302018-10-15T00:21:00+5:30
उल्हासनगर : डम्पिंगवरील कचरा सपाटीकरणावर साडेतीन कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. या सर्व प्रकारात सावळागोंधळ असून जेसीबी व ...
उल्हासनगर : डम्पिंगवरील कचरा सपाटीकरणावर साडेतीन कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. या सर्व प्रकारात सावळागोंधळ असून जेसीबी व पोकलेन मशीन खरेदी करून पालिका कचऱ्याचे सपाटीकरण का करत नाही, असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी उपस्थित केला आहे.
राणा खदाण येथील डम्पिंग ओव्हरफ्लो झाल्यानंतर महापालिकेने कॅम्प नं.-५, खडी मशीन खदाण येथे डम्पिंग सुरू केले. शहरातील कचरा उचलणे, कचºयाचे सपाटीकरण, डेब्रिज उचलणे आदींवर महापालिका तब्बल २३ कोटींपेक्षा जास्त खर्च करत आहे. फक्त कचरा उचलण्यावर दररोज चार लाख ६० हजार पालिका खर्च करते.
दोन पोकलेन व जेसीबी मशीनने कचºयाचे सपाटीकरण करणार असून वर्षाला तीन कोटी ५२ लाखांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. पालिकेने त्याच किमतीतून पोकलेन व जेसीबी मशीन खरेदी करून कचºयाचे सपाटीकरण केल्यास दरवर्षी साडेतीन कोटी पालिकेचे वाचू शकतात, असे मत बोडारे यांनी व्यक्त केले.
स्थायी समिती बैठकीत कचरा सपाटीकरणावर साडेतीन कोटी खर्चाच्या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला. मात्र, बहुमताच्या आधारे भाजपा व साई पक्षाने प्रस्तावाला मान्यता दिल्याचे बोडारे यांनी सांगितले. स्थायी समितीमध्ये असेच विषय मंजूर झाले, तर महापालिकेची वाटचाल अधोगतीकडे होत आहे, असे समजावे, असेही बोडारे म्हणाले.
प्रस्तावाच्या चौकशीची मागणी
डम्पिंग ग्राउंडवर दोन जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे सतत आठ तास कचरा सपाटीकरणाचे काम सुरू राहणार का? वर्षाला तीन कोटी ५२ लाख कंत्राटदाराला देण्यापेक्षा त्या निधीतून पोकलेन व जेसीबी मशीन महापालिकेने का खरेदी करू नये? कचºयाचे सपाटीकरण पालिकेने केल्यास साडेतीन कोटींची बचत होणार आहे. आदी अनेक प्रश्न बोडारे यांनी करून प्रस्तावाच्या चौकशीची मागणी केली.