डम्पिंग बंद, पण आग लागण्याचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST2021-05-31T04:28:55+5:302021-05-31T04:28:55+5:30
कल्याण : येथील पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील वाडेघर डम्पिंगला शनिवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. चार तासांत आगीवर नियंत्रण ...

डम्पिंग बंद, पण आग लागण्याचे सत्र सुरूच
कल्याण : येथील पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील वाडेघर डम्पिंगला शनिवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. चार तासांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. डम्पिंगवर कचरा टाकणे नुकतेच कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी जोपर्यंत कचरा पूर्णपणे हटविला जात नाही, तोपर्यंत कचऱ्याला आगी लागण्याचे सत्र सुरूच राहणार असल्याचे बोलले जाते.
दरवर्षी उन्हाळ्यात डम्पिंगला आग लागते. यंदाही हे सत्र कायम राहिले. १६ मार्चला डम्पिंगला आग लागली होती. त्यावेळी सुमारे तीन ते चार एकर परिसरातील कचऱ्याला आग लागल्याने, डम्पिंगला लागून असणारा सीएनजी पंपही बंद ठेवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीचा धूर वाऱ्याबरोबर सभोवतालच्या परिसरात पसरला होता. दरम्यान, शनिवारी रात्री पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या बाजूस ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या आधी त्या ठिकाणी जाण्यास रस्ता नव्हता. परंतु केडीएमसीने अग्निशमन विभागाचे वाहन जाईल, तेवढा रस्ता नुकताच बनविल्याने, त्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने नेऊन आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविणे शक्य झाले. पाच बंबांच्या साहाय्याने आग विझविल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.
---------------------------------------------
तक्रारी कागदावरच
१६ मार्चला डम्पिंगला आग लागली होती. रात्री ९.३०च्या सुमारास डम्पिंगला लागलेली आग खोलवर गेल्याने पुढे पाच दिवस धुमसतच होती. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविल्यानंतर डम्पिंगच्या परिसरात डिझेल भरलेल्या बाटल्या निदर्शनास आल्या होत्या. सहसा कोणालाही दिसणार नाहीत, अशा पद्धतीने त्या बाटल्या कचऱ्यात ठेवण्यात आल्या होत्या. यावरून आग कोणीतरी मुद्दाम लावत असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मनपाने तक्रार दाखल केली आहे. यात प्रामुख्याने कचरावेचक व भंगारवाल्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे, परंतु दोन महिने उलटूनही कारवाई झालेली नाही. यापूर्वीही प्रशासनाने आगीप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारीही तपासाविना पडून आहेत.
------------------------------------------------------