शाळेच्या बाजूला शेणाचा उकिरडा, जि.प. शाळेला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:27 AM2020-10-03T00:27:31+5:302020-10-03T00:27:47+5:30
जि.प. शाळेला ठोकले टाळे : अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न
अंबरनाथ : येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाजूलाच शेणाचा उकिरडा आणि अस्वच्छतेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी काकोळे येथे ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला.
अंबरनाथ तालुक्यातील काकोळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेशेजारीच असलेल्या जागेमध्ये शेण आणि घाण उघड्यावर टाकले जाते. त्यामुळे शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार वारंवार जिल्हा परिषद, अंबरनाथ तालुका पंचायत समिती यांच्याकडे करूनही कारवाई झालेली नाही. याच्या निषेधार्थ छत्रपती शासन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश गायकर यांनी शुक्रवारी शाळेला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अंबरनाथचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींना या प्रकरणी निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.
आंदोलने करूनही दखल नाही! : लॉकडाऊनमुळे सध्या शाळा बंद आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत सरकारी पातळीवर पत्रव्यवहार, आंदोलने करूनही त्याची दखल न घेतल्याने अखेर शाळेला टाळे ठोकून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे गायकर म्हणाले. शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आल्याचे गायकर यांनी सांगितले.