तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघांनी विटाव्यामध्ये मोटारीला लावली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:55+5:302021-04-23T04:42:55+5:30
ठाणे: विटाव्यातील जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या अनंत भगत (३४) याच्या स्कॉर्पिओ मोटारीला तोंडावर रुमाल बांधलेल्या दोन अज्ञातांनी आग ...
ठाणे: विटाव्यातील जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या अनंत भगत (३४) याच्या स्कॉर्पिओ मोटारीला तोंडावर रुमाल बांधलेल्या दोन अज्ञातांनी आग लावल्याची घटना बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कळव्यातील विटावा सूर्यनगर गेट क्रमांक एक येथील रहिवासी भगत याने त्याची स्कॉर्पिओ ऋषी पार्क अपार्टमेंटजवळ उभी केली होती. २१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील दोघांनी त्याच्या स्कॉर्पिओला आग लावून मोठे नुकसान केले. भगत याच्याविरुद्ध नवी मुंबईतील रबाले पोलीस ठाण्यात विनयभंगासह जबरी चोरीचेही गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे याच रागातून कोणीतरी हे कृत्य केल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याच्या वाहनाला आग लावणारे दोघेजण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. मोहिते हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.