सुटीमध्ये काम केल्यास कामगारांना दुप्पट वेतन
By admin | Published: July 18, 2015 11:54 PM2015-07-18T23:54:29+5:302015-07-18T23:54:29+5:30
ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना यापुढे सार्वजनिक सुट्यांमध्ये काम केल्यास त्या दिवसाचे दुप्पट वेतन आणि वर्षातून २१ दिवस सुटी न घेतल्यास त्याचे वेतनदेखील
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना यापुढे सार्वजनिक सुट्यांमध्ये काम केल्यास त्या दिवसाचे दुप्पट वेतन आणि वर्षातून २१ दिवस सुटी न घेतल्यास त्याचे वेतनदेखील देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कामगार उपायुक्तांकडे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्याची माहिती म्युनिसिपल लेबर युनियनने दिली. यामुळे पालिकेच्या विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ठाणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये हजारोंच्या संख्येने कंत्राटी कामगार आहेत. २६ जानेवारी, १ मे, १५ आॅगस्ट आणि २ आॅक्टोबर या चार सार्वजनिक सुट्या वगळता इतर सर्व सुट्यांचा आनंद ते घेत असतात. कंत्राटी कामगारांना मात्र या वेळी काम करावे लागत होते. त्यांना २१ दिवसांच्या भरपगारी रजेची रक्कम आणि या चार सार्वजनिक सुट्या मिळत नसल्याची तक्र ार म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी ठाण्याच्या कामगार उपायुक्तांकडे केली होती. यासंदर्भात त्यांच्याकडे युनियनची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कामगारांना देय असलेल्या चार सार्वजनिक सुट्यांबाबत चर्चा
होऊन कामगारांनी त्या दिवशी काम केल्यास त्यांना दुप्पट पगार आणि तीन दिवसांच्या आत १ पर्यायी रजा
देण्याची कार्यवाही करण्याचे प्रशासनाने मान्य केल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)