रुग्णदुपटीचा कालावधी 15 दिवसांत दुप्पट; कालावधी ८८९ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:08 PM2021-01-01T23:08:04+5:302021-01-01T23:08:15+5:30
ठामपाला माेठा दिलासा
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत डिसेंबर महिन्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून आली आहे. १५ दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी हा ४३१ दिवसांवर होता. तो ३१ डिसेंबर रोजी ८८९ दिवसांवर आला आहे. तर, दररोजच्या बाधित रुग्णांची संख्यादेखील ३०० वरून १०० च्या आसपास आली आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२५ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर, मृत्युदर २.२५ टक्क्यांवर आला असून रुग्णवाढीचे प्रमाण ६.६० टक्के एवढे आहे.
ठाणे महापालिका हद्दीत गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्येत घट झाली आहे. आता रोज ८० ते ११५ रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत आठ लाख ३७ हजार ७२३ कोरोना चाचण्या केल्या असून या सर्वांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत ५५ हजार ३२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५३ हजार २४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांचे प्रमाण ९६.२५ टक्के आहे. तर, शहरात आतापर्यंत एक हजार २४७ रुग्ण मृत पावले आहेत. त्याचबरोबर शहरात केवळ आजघडीला प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ८२६ एवढी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या घटल्याने रुग्णालयांमधील खाटा रिकाम्या आहेत. तर, ग्लोबल कोविड सेंटरमध्ये आता बहुसंख्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येत्या काही दिवसांत ते आणखी खाली आणण्याचे प्रयत्न आहेत.