ठामपा हद्दीत रुग्ण दुपटीचा कालावधी ७०७ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:27+5:302021-06-03T04:28:27+5:30
ठाणे : कोरोनाला रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन आणि ठामपाच्या विविध उपाययोजना तसेच दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढविल्याने ठाण्यात मे महिन्यात ...
ठाणे : कोरोनाला रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन आणि ठामपाच्या विविध उपाययोजना तसेच दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढविल्याने ठाण्यात मे महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा स्तर खाली आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता पुन्हा ९७ टक्क्यांवर आले आहे. एप्रिलमध्ये कोरोनाचे नवे ४१ हजार २५ रुग्ण आढळले होते. तर, मे महिन्यात १० हजार ७४७ नवे रुग्ण आढळले असून, याच कालावधीत १८ हजार २८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे याच कालावधीत २४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी हा थेट ७०७ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे ठामपाच्या आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.
ठामपा हद्दीत आतार्यंत एक लाख २९ हजार पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एक लाख २५ हजार ७१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एप्रिल २०२१ अखेर प्रत्यक्ष उपचार घेणारे रुग्ण १० हजार १३ एवढे होते. सध्या केवळ एक हजार ५३० रुग्ण उपचाराधीन आहेत.
फेब्रुवारीअखेर पासून ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले होते. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत होते. ठामपाने वर्षभरात १६ लाख ४३ हजार ६४४ नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे. तर आजही दिवसाला तीन हजारांच्या आसपास चाचणी केल्या जात आहेत. परंतु, आता मागील महिनाभरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मागील एप्रिलअखेर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्के होते. तेच आता ९७ टक्क्यांवर आले आहे.
ठामपातर्फे कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. एकाला बाधा झाली तर त्याच्या संपर्कातील ३७ जणांना विलगीकरणात ठेवले जात आहे. लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांत रुग्ण दरवाढीचा वेग काहीसा कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
एप्रिलमध्ये ठामपा हद्दीत ४१ हजार २५ नवे रुग्ण आढळले, तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे याच कालावधीत ३९ हजार ८०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. त्या तुलनेत मे महिन्यात नवे १० हजार ७४७ रुग्ण आढळले. तर, याच कालावधीत १८ हजार २८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मे महिन्यात २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही थोडीशी चिंतेची बाब असली तरी देखील मृत्यूदर कमी करण्यासाठी ठामपाचे प्रयत्न सुरू आहेत.
-------------