दुर्गाबाई भागवत मनाने अत्यंत मृदू होत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:54 PM2019-07-21T23:54:41+5:302019-07-21T23:55:44+5:30
वासंतिका पुणतांबेकर : ‘तस्मैश्री’ कार्यक्रमातून साहित्यावर टाकला प्रकाश
ठाणे : मला दुर्गाबाई भागवत यांच्या साहित्याचे आकर्षण होते. त्यांचे साहित्य हिंदीत अनुवादित झाले, तर ते संपूर्ण भारतात वाचले जाईल. मी त्यांना याबद्दल सांगितले होते. प्रकाशकांनी त्यांचे साहित्य हिंदीत प्रकाशित करण्यासाठी दुर्गाबाईंची परवानगी लागेल, असे सांगितले. त्यानुसार, मी त्यांच्याकडे परवानगी मागितली आणि ती त्यांनी लगेच दिली. त्यांचे साहित्य कठीण होते. त्या स्वत:च्या मतांशी ठाम होत्या. त्या स्पष्टवक्त्या असल्या, तरी मनाने मृदू होत्या, अशा भावना त्यांची मानसकन्या, अनुवादिका, ज्येष्ठ साहित्यिका वासंतिका पुणतांबेकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केल्या.
मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात तस्मैश्री या कार्यक्रमातून दुर्गाबाईंच्या साहित्यावर शनिवारी प्रकाश टाकण्यात आला. पुणतांबेकर यांनी दुर्गाबार्इंचे साहित्य अनुवादित केले आहे. याबद्दलचे काही किस्से त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले. चित्रकार, कवी रामदास खरे यांनी त्यांच्या पत्राला दुर्गाबार्इंचे आलेले उत्तर यावर त्यांचा लेख ‘चविष्ट संवाद’ सादर केला. चित्रकार विजयराज बोधनकर यांनी व्यासपर्वावर आधारित ‘महाभारताचे मानसशास्त्र’ याचे सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यात महाभारतावरील त्यांच्या १० चित्रांचाही समावेश केला होता. त्यांच्या लोकसाहित्यविषयक संशोधनामधील ‘हदग्याची किंवा भोंडल्याची गाणी’ या त्यांच्या लेखाचे मानसी जोशी यांनी अभिवाचन केले. त्यांच्या साहित्यात ‘पैस’ हे पुस्तक मैलाचा दगड मानले जाते. त्यातील पैशांचा खांब आणि गेंडा सूत्र यावर डॉ. क्षितिज कुलकर्णी यांचे अभिवाचन आणि अभिनव सावंत, पवन वेलकर यांचे सादरीकरण रंगले. ‘दुर्गा भागवत - व्यक्ती, विचार, कार्य’ या पुस्तकातील मुद्दे घेऊन त्यावर स्वत:चा आजच्या पिढीचे विचार मांडणारा शोधनिबंध आयोजक कार्तिक हजारे यांनी सादर केला. विचार संचित या पुस्तकातून तयार केलेला शोधनिबंध सलोनी बोरकर यांनी सादर केला. सुनीता फडके यांनी ऋतुचक्रामधील १२ महिने संकलित करून प्रत्येक महिन्याच्या सौंदर्याचा आणि वैशिष्ट्याचा अनुभव आपल्या वाचनातून प्रेक्षकांना दिला. निवेदिका वासंती वर्तक यांनी त्यांचे स्त्रीमुक्तीविषयक विचार मांडले.